सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी
औरंगाबाद,10 जून : प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य असतं. पण प्रेमासाठी कोणाची हत्या झाली तर तो अपराध असतो. औरंगाबादमध्ये एका प्रेमी युगुलानं त्यांच्या प्रेमासाठी निष्पाप महिलेचा बळी घेतला. पण हे पाप लपू शकलं नाही.
प्रेमासाठी बेभान झालेले विकृत काहीही करू शकतात. एका महिलेचा जळालेला मृतदेह अशाच विकृत प्रेमाची साक्ष देतोय. औरंगाबाद शहरानजीक असलेल्या पिसादेवीच्या निर्जळ परिसरात हा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला. चप्पल, पैंजन आणि कानातले डोरले यावरून हा मृतदेह सोनाली शिंदेंचा असल्याचा कयास पोलिसांनी लावला. सोनालीच्या घरच्यांनीही हा मृतदेह सोनालीचाच असल्याचा दावा केला. सोनालीच्या भावानं दिलेल्या तक्रारीवरून सोनालीचा पती सदाशिव शिंदेला अटक करण्यात आली.
इथपर्यंत तुम्हाला वाटेल सदाशीव याने आपली पत्नी सोनालीचा खून केला आणि खुनाच्या आरोपात त्याला जेलमध्ये जावे लागलं. पण, पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आल्यानंतर ही आत्महत्या नव्हे तर खून असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. तपासात धक्कादायक सत्य समोर आलं. मयत महिला ही सोनाली शिंदे नव्हती तर हर्सूल परिसरातील वेश्याव्यवसाय करणारी रूख्मिणबाई माळी असल्याचं सिद्ध झालं.
क्राईम स्टोरीचा लव्ह अँगल पोलिसांनी शोधून काढला. सोनाली शिंदे आणि अंबादास वैष्णव या दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांना अडथळा होता तो सोनालीचा पती सदाशिव शिंदेचा सदाशिवला अडकवण्यासाठी कट रचण्यात आला. अंबादासने सोनालीकडून पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची सुसाईड नोट लिहून घेतली. सोनालीची चप्पल, पैंजन, कानातले डोरले घेतले.
वेश्याव्यवसाय करणाऱ्या रूख्मिनबाई हिला पिसादेवी परिसरातील निर्जळस्थळी नेऊन तिचा गळा दाबून हत्या केली. रख्मिणबाईच्या मृतदेहावर सोनालीच्या चपला, पैंजन, डोरले घातले. गळा दाबून हत्या केल्यानंतर रूक्मिणीचा मृतदेह जाळण्यात आला.
रूख्मिणबाईची हत्या केल्यानंतर अंबादास वैष्णवनं सोनालीला घेवून पलायन केलं. मृत झालेल्या सोनालीचा मोबाईल मात्र, वेगवेगळे लोकेशन दाखवत होता. त्यामुळे मोबाईल लोकेशननुसार पोलीस पाठलाग करत होते. अखेर किलर लव्हर्सला चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर पकडण्यात आलं. मयत सोनालीला समोर बघून पोलीसही हैराण झाले.
सोनाली आणि अंबादास यांनी सोनालीच्या मृत्यूचा चांगला बनाव केला. ज्यामुळे मयत सोनालीला कुणी शोधणार नाही आणि सोनालीच्या बनावट मृत्यूमुळे तिचा नवरा सदाशिव जेलमध्ये राहील. या सगळ्या नाट्यात रूख्मिणबाईचा नाहक बळी गेला. या प्रेमीयुगूलालाही आता आयुष्यजेलमध्येच काढावे लागेल. शेवटी गुन्हा किती डोकं लावून केला तरी 'कानून के हात लंबे होते है', हे सिद्ध झाले.
========================