BREAKING : औरंगाबादमध्ये रेल्वेखाली आल्याने 16 मजूर जागीच ठार

BREAKING : औरंगाबादमध्ये रेल्वेखाली आल्याने 16 मजूर जागीच ठार

रेल्वे रुळावर झोपलेले 16 मजूर रेल्वेखाली आल्याने जागीच ठार झाले आहेत.

  • Share this:

औरंगाबाद : औरंगाबादमधील करमाड इथं रेल्वे रुळावर झोपलेले 16 मजूर रेल्वेखाली आल्याने जागीच ठार झाले आहेत. औरंगाबाद-जालना रेल्वे लाईनवर करमाड शिवारात परराज्यातील 16 मजूर रुळावर झोपले होते. आज सकाळी साडेसहा वाजता रेल्वेखाली आल्याने या मजुरांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यामुळे हे मजूर मिळेल त्या रस्त्याने घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत रात्रीच्या विसाव्यासाठी रेल्वे रुळाचा आधार घेणाऱ्या 16 मजुरांवर औरंगाबादमध्ये काळाने घाला घातला आहे.

औरंगाबादमधील रेल्वे अपघातातील कामगार मध्यप्रदेश मधील शहडोल व उमरिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. रेल्वे अपघातात काही मजूर जखमीदेखील झाले आहेत. जखमींची जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी घाटी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

'औरंगाबाद, महाराष्ट्रात झालेल्या रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत व्यथित आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी बोललो असून ते परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आवश्यक सर्व सहकार्य दिले जात आहे,' असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

'स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात अडकलेल्या गुजराती मजूर बांधवाच्या प्रवासाचा खर्च उचलण्यास काँग्रेस पक्ष तयार असतानाही गुजरात सरकार आपल्या नागरिकांना स्वीकारत नाही हे दुर्दैवी आहे. मुंबईहून सम्बियाली (कच्छ) गुजरातला जाणाऱ्या 1200 गुजराती बांधवांच्या प्रवासाला गुजरात सरकारने अजूनही परवानगी दिलेली नाही. याशिवाय ओडीसा, प. बंगाल, कर्नाटक या राज्यांकडून स्थलांतरित मजुरांना प्रवेश देण्यास टाळाटाळ केली जात आहे', असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

First published: May 8, 2020, 7:28 AM IST

ताज्या बातम्या