मुलीची मुलासोबत मैत्री असू शकत नाही? पायलनं आत्महत्येपूर्वी लिहिलं वडिलांना ह्रदयस्पर्शी पत्र!

मुलीची मुलासोबत मैत्री असू शकत नाही? पायलनं आत्महत्येपूर्वी लिहिलं वडिलांना ह्रदयस्पर्शी पत्र!

सामाज आणि नातेवाईकांचे टोमणे सहन न झाल्यानं औरंगाबादच्या 17 वर्षांच्या पायल गायकवाड या मुलीनं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिनं वडिलांना लिहिलेलं पत्र सर्वांनाच अंतर्मुख करणारं आहे.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम,औरंगाबाद,ता.08 मे: मुलगा-मुलगी एकत्र दिसले की अनेक जण त्यांच्याकडे संशयानं पाहतात. त्यांच्याबद्दल दबक्या आवाजात नको त्या चर्चा करतात. एखाद्याच्या शुद्ध मैत्रीवर संशय घेताना त्या मुलाला आणि मुलीला नेमकं काय वाटत असेल, याचा साधा विचारही कुणी करत नाही. औरंगाबादमधल्या पायलच्या मैत्रीवरही समाजानं असाच संशय घेतला. आणि ही गोष्ट तिला जिव्हारी लागल्यानं तीनं टोकाचं पाऊल उचललं.

सामाज आणि नातेवाईकांचे टोमणे सहन न झाल्यानं औरंगाबादच्या 17 वर्षांच्या पायल गायकवाड या मुलीनं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. पायल अकरावीत शिकत होती. आत्महत्याकरण्यापूर्वी तीनं आपल्या वडिलांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात आपली व्यथा मांडली. काही वर्षांपूर्वीच पायलच्या आईचं निधन झालं होतं. त्याचवेळी माझा अर्धा जीव गेला होता आता मी ही जात आहे असं तीनं पत्रात लिहिलंय.

पायलचं पत्र...

Sorry पप्पा,

मी जे काही करतेय त्यासाठी कुणीच जबाबदार नाहीये.

आई सोडून गेली तेव्हाच अर्धा जीव गेला होता माझा. ती सोडुन गेली आता मी पण जाते.

माझ्या आयुष्यात फक्त दोनच लोक महत्वाचे आहेत, ते म्हणजे माझे आई-वडील आणि माझा कॉन्टीन कट्टा, म्हणजेच माझे मित्र-मैत्रिणी.

मित्र म्हटलं की घरच्यांना काय वाटतं काय माहीत? जशी एक मैत्रीण असते तसाच एक मित्र असतो. पण आपल्या घरी एवढा भेद का करतात तेच कळत नाही.

पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जर एखाद्या मुलीनं मुलासोबत मैत्री केली तर याचा अर्थ असा होत नाही की मुलगी बिघडलीय. हे मी समजवायचा प्रयत्न केलाय पण काही लोकांना ते कळतच नाही.

पण पप्पा मी असं कधीच काम केलेलं नाही, ज्यानं तुमचं नाव खराब होईल. लोकांनी माझ्यावर नको नको ते आरोप केले होते. पण मी कधीच वाईट मार्ग वापरला नाही.

प्रज्वलची काळजी घ्या आणि तुमची पण.

मी गेल्यावर मला औरंगाबादच्या बाहेर नेऊ नका, इथेच कुठे तरी पुरून टाका. माझ्या फ्रेंड‌्सचा जीव आहे माझ्यात.

येतील ते कधी कधी मला भेटायला.

तुमचीच 

पायल

पायलच्या आत्महत्येनं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

  • पायलला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं ?
  • मुलगा आणि मुलगी यांच्या मैत्रीकडे प्रत्येकवेळी संशयाच्या नजरेनं बघणं चुकीचं नाही का?
  • मुलांवर एखादा विचार लादण्याऐवजी पालकांनी त्यांच्या मनात डोकावून बघायला नको का?
  • पायलच्या वडिलांनी कधी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता का?
  • आजची पिढीला फेसबुक, व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो मित्र लाभलेत.
  • आभासी दुनियेतले मित्र फक्त कॉम्प्युटर आणि मोबाईल स्क्रीनपुरतेच उरलेत का?
  • मनमोकळेपणानं बोलण्यासाठी आजच्या तरूणाईला खरे मित्र उरलेच नाहीत का?

ज्या कारणांमुळं पायलनं आत्महत्या केली, तशी परिस्थिती भविष्यात कुणावरही ओढवू नये म्हणून प्रत्येक विद्यार्थी आणि पालकानं या प्रश्नांची उत्तर शोधणं गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2018 05:53 PM IST

ताज्या बातम्या