बांदिवडेकरांच्या उमेदवारीबाबत अशोक चव्हाणांचं सूचक वक्तव्य

बांदिवडेकरांच्या उमेदवारीबाबत अशोक चव्हाणांचं सूचक वक्तव्य

काँग्रेसने जाहीर केलेले लोकसभेचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर हे सनातन संस्थेशी निगडित असल्याची बाबसमोर आल्यानंतर काँग्रेसकडून याची दखल घेण्यात आली आहे.

  • Share this:


मुंबई, 21 मार्च : काँग्रेसने जाहीर केलेले लोकसभेचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर हे सनातन संस्थेशी निगडित असल्याची बाबसमोर आल्यानंतर काँग्रेसकडून याची दखल घेण्यात आली आहे. काँग्रेस सनातनसारख्या कट्टरतावादी विचारांच्या विरोधात आहे. पक्ष त्यांच्या उमेदवारीबद्दल योग्य निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याआधीच काँग्रेसच्या उमेदवारावरुन वादंग निर्माण झाला आहे. रत्नागिरीतून ज्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आले त्याचे थेट संबंध सनातन संघटनेशी जोडलेले असल्याचं समोर आलं. अशोक चव्हाण यांनी टि्वट करून या प्रकरणी पहिली प्रतिक्रिया देत, उमेदवारीबाबत योग्य निर्णय घेऊ असं सूचक वक्तव्य केलंं आहे.

काय आहे प्रकरण?

नालासोपारा खटल्यातला आरोपी वैभव राऊत याला सोडवण्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला होता त्यामध्ये नवीनचंद्र बांदिवडेकर सहभागी होते. नवीनचंद्र बांदिवडेकर हे भंडारी समाजाचे नेते आहेत. त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हात जोडून पक्षात बोलवलं आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची उमेदवारी दिली, अशी सूत्रांची माहिती आहे.

बांदिवडेकर यांनी वैभव राऊतला सोडवण्यासाठीच्या मोर्चामध्ये भाषण केलं होतं. वैभव राऊत हिंदुत्वाच्या रक्षणासाठी झटला, या शब्दात त्यांनी त्याचं कौतुक केलं होतं. त्यांचं हे वक्तव्य 'दैनिक सनातन प्रभात' मध्ये छापून आलं आहे.

अशा व्यक्तीला उमेदवारी दिल्याने काँग्रेसवर टीका होतेय. पण बांदिवडेकर आणि सनातन संस्थेचा संबंध नाही. बांदिवडेकर 'सनातन'ची विचारधारा आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात आहेत आणि हा विरोध पुढेही कायम राहील, असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

नवीनचंद्र बांदिवडेकर हे अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आपला पूर्ण समाज वैभव राऊतच्या पाठिशी आहे, त्याला न्याय मिळायला हवा, अशा शब्दात त्यांनी वैभव राऊतची पाठराखण केली होती.

याबदद्ल News 18 लोकमत ने नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यावर वैभव राऊत हा भंडारी समाजाचा असल्याने मी त्याची पाठराखण केली, असं त्यांनी म्हटलं आहे. कोर्टाने त्याला दोषी ठरवलं तर त्याला आमचा पाठिंबा राहणार नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, बांदिवडेकर यांना उमेदवारी देणं हे हिताचं ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी News 18 लोकमत शी बोलताना दिली आहे.

ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणी 'सनातन' संस्थेच्या सदस्यांना अटक झाली होती. त्याचप्रमाणे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेवर आरोप झाले आहेत, या संस्थेच्या साधकांना अटकही झाली आहे.

==================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2019 11:13 PM IST

ताज्या बातम्या