राष्ट्रीयकृत बँकांना 2. 11 लाख कोटींचं भांडवल देणार - जेटली

राष्ट्रीयकृत बँकांना 2. 11 लाख कोटींचं भांडवल देणार - जेटली

राष्ट्रीयकृत बँकांचं भांडवल 2,11,000 कोटी रुपयांनी वाढवण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी यासंबंधीची घोषणा केलीय. त्यासाठी बजेटमध्ये प्रस्तावित केलेले 18 हजार कोटी रुपयांचे भांडवल बँकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : राष्ट्रीयकृत बँकांचं भांडवल 2,11,000 कोटी रुपयांनी वाढवण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी यासंबंधीची घोषणा केलीय. त्यासाठी बजेटमध्ये प्रस्तावित केलेले 18 हजार कोटी रुपयांचे भांडवल बँकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, बँकांमधील सरकारी हिस्सा कमी करण्यात येणार असून ते प्रमाण 52 टक्क्यांपर्यंत आणण्यात येणार आहे. या निर्गुंतवणुकीमुळे 35 हजार कोटी रुपयांचे भांडवल बँकांना मिळेल असंही ते म्हणाले. तसेच, रिकॅपिटलायझेशन बाँड्स किंवा कर्जरोख्यांच्या माध्यमातून उर्वरीत भांडवल उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीयकृत बँकांना आर्थिक अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी आणि बाजारात जास्तीत जास्त कर्जाऊ रक्कम उपलब्ध व्हावी, यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.

दरम्यान, जीएसटी ही सर्वात मोठी सुधारणा असून, या नव्या करप्रणालीद्वारे भ्रष्टाचारही कमी झाल्याचा दावाही अरूण जेटलींनी केलाय. तसंच सरकारकडे सध्या 400 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त परकीय गंगाजळी असून जानेवारी 2014 पासून त्यात 100 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे, असंही जेटलींनी यावेळी स्पष्ट केलं. 2017-18 या आर्थिक वर्षात महागाई 3.5 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहील, असा दावाही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलाय.

मागच्या दोनवर्षात चालू खात्यातील आर्थिक तूट कमी झाली असून देशाची आर्थिक स्थितीही मजबूत असल्याचा दावा अरुण जेटली यांनी केलाय. केंद्र सरकार भारतमाला योजनेतंर्गत 34,800 किलोमीटरचे रस्ते बांधणार असून पहिल्या टप्प्यात किनारपट्टी भागात 2 हजार किलोमीटरचे रस्ते बांधले जातील असंही सरकारच्यावतीने यावेळी स्पष्ट करण्यात आलं.

आगामी 5 वर्षात केंद्र सरकार विविध रस्ते विकास प्रकल्पांवर तब्बल 7 लाख कोटी रुपये खर्च करुन 83,677 किलोमीटरचे महामार्ग बांधणार आहे. त्यातून देशभरात 14 कोटी रोजगार निर्माण होतील, असा दावाही जेटलींनी यावेळी केला

देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस खालावत चालल्याची टीका विरोधकांकडून होतेय. त्याला आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलंय. यावेळी त्यांनी सरकारतर्फे हाती घेण्यात आलेल्या विकास प्रकल्पांमधून करण्यात आलेल्या आर्थिक गुंतवणुकीची आकडेवारीच उपस्थितांसमोर मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2017 06:27 PM IST

ताज्या बातम्या