02 ऑगस्ट : विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटच्या दिवशी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर आदर्श घोटाळ्याचा अहवाल विधिमंडळात मांडला जाणार अशी चर्चा होती. पण आजच्या कार्यक्रमपत्रिकेत हा विषयच घेण्यात आलेला नाही. आदर्श घोटाळ्याच्या अहवालात मोठा गौप्यस्फोट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
या अहवालात काँग्रेसचा एखाद-दुसरा बडा नेता अडकण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. आदर्शच्या अहवालामुळे नोकरशाहीसुद्धा हादरण्याची शक्यता आहे. पण संसद अधिवेशनाच्या तोंडावर कोणताही धोका पत्करायला काँग्रेस तयार नाही. त्यामुळे तूर्तास हा अहवाल मांडू नये, यासाठी दिल्लीचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर दबाव असल्याचं समजतंय.
अजूनपर्यंत आपल्याकडे अहवालाची प्रत किंवा विनंती आली नाही असं विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलंय. सरकारच्या या भूमिकेमुळे विरोधक संतापलेत. अहवाल आजचा मांडावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. तर आदर्शचा अहवाल कृती अहवालासह मांडा, अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही केलीय.त्यामुळेच आज हा अहवाल मांडण्याविषयी संदिग्धता आहे.
'आदर्श' अहवाल
फडणवीस यांचे आरोप
- वादग्रस्त आदर्श सोसायटीत अनेक बेनामी फ्लॅट्स
- काही प्रमुख नेत्यांनी दुसर्यांच्या नावे घेतले फ्लॅट्स
- प्रमुख नेत्यांशी संबंधित बँक खात्यांतून फ्लॅट्ससाठी पैसे वळते झाले
- पैसे तीन-चार बँक खात्यातून फिरवून दिल्याचा आरोप
- आदर्श अहवालावर चर्चा झाल्यास नेत्यांची नावं उघड करण्याचा इशारा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा