विदर्भात पावसाचा धोधो-धिंगाणा

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 20, 2013 09:49 PM IST

Image img_206682_vidharbrai_240x180.jpg20 जुलै : पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलंय. गेल्या चार दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. जिल्ह्यात दोन दिवसांत चौघांचा मृत्यू झालाय. पावसामुळे चंद्रपूर शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलंय. अनेक घरं आणि दुकांनामध्ये पाणी शिरलंय. औष्णीक वीज निर्मिती केंद्रात पाणी घुसल्यानं वीजनिर्मितीवरही परिणाम झाला. गडचिरोली जिल्हयात पावसामुळे एकाचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात प्राणहिता नदीचं पाणी सिरोंचा गावात शिरलंय. सिरोंचा आणि त्याच्या जवळच्या गावातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची प्रकिया सुरू आहे. सिरोंचा तालुक्याचा संपर्कही पूर्णपणे तुटला आहे. 24 तास होऊन गेले तरी परिस्थती जैसे थे आहे.

रेल्वे वाहतूक पूर्ण ठप्प

वर्ध्यात अजूनही तुफान पाऊस सुरू आहे. सिंधी रेल्वे भागातल्या 200 हून जास्त घरांत पाणी शिरलंय. धोंडगावमध्ये चारही बाजूनं पाणी शिरल्यानं गावाचा संपर्क तुटला आहे. नागपूर रेल्वेमार्गावरील सिंधीरेल्वेजवळचा 30 मीटरच्या रेल्वे ट्रॅकवरील खडी वाहून गेली आहे. यामुळे मुंबई- नागपूर आणि नागपूर -चेन्नई रेल्वे वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील मुख्य 3 रस्ते बंद आहेत. वर्धा- नागपूर, वर्धा - जाम, वर्धा -राळेगाव हे 3 राज्यमार्ग ठप्प झाले आहेत.

वीज निर्मिती मंदावली

चंद्रपूर औष्णीक वीज निर्मिती केंद्रात पावसाचं पाणी गेल्यानं संच बंद करण्यात आले आहे. या केंद्रातून सध्या फक्त 200 मेगावॅट वीजनिर्मिती होतेय. कारण 7 पैकी 5 संच बंद करण्यात आलेत. या वीज निर्मिती केंद्राची एकूण क्षमता 2340 मेगावॅट इतकी आहे. दरम्यान त्याचं दुरुस्तीचं काम सुरु आहे. तिकडे गडचिरोली जिल्हयाच्या पाच तालुक्यात 1 हजार घरांची पडझड झाली आहे. 250 गावांचा वीजपूरवठा गेल्या 36 तासांपासून बंद आहे. पावसामुळे बीएसएनएलची मोबाईल सेवाही ठप्प झाली आहे.

Loading...

कल्याणमध्ये बारवी धरण भरलं

गेल्या महिन्याभरापासून मराठवाडा वगळता राज्याच्या जवळपास सर्व भागांत जोरदार पाऊस होतोय. त्यामुळे धरणं भरतायत. गेल्या महिनाभरात ठाणे जिल्हयात जोरदार पाऊस झाल्यानं कल्याण तालुक्यातलं बारवी धरण वाहू लागलंय. 15 वर्षात पहिल्यांदाच जुलै महिन्यात धरण पूर्ण भरलंय. गेल्या वर्षी हे धरण 19 सप्टेंबर ला भरलं होतं. या धरणातून ठाणे, कल्याण डोंबीवली, अंबरनाथ, मिरा भाईंदर, उल्हासनगर आणि नवीमुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. धरण क्षेत्रात पाऊस सुरुच असून धरणातून 290 क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

सांगलीत धरण फुल्ल

सांगली जिल्हयातही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या चोवीस तासात 83 मिलीमिटर पावसाची नोंद झालीये. जिल्ह्यातील चांदोली धरण 84 टक्के भरल्यानं धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून 5 हजार 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे वारणा नदीकाठच्या 29 गावांना सतर्कतेचा आदेश दिला गेला.

अप्पर वर्धा धरणाचे 5 दरवाजे उघडले

पावसामुळं अमरावती जिल्ह्यातल्या अप्पर वर्धा धरणातली पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत. अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2013 01:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...