12 जुलै : रायगड जिल्ह्याला पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. जिल्हयात गेल्या चोवीस तासात सरासरी 117 मिमी पावसाची नोंद झालीय. सुधागड तालुक्यातील पाली इथं अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलीये. त्यामुळे पालीमध्ये नदी पूल पाण्याखाली गेलाय. खालापूर येथे निगडोली पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. कोकणात बहुतांशी धरणं पूर्ण भरली आहेत. तर, रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीला पूर आलाय. या पुराचं पाणी आजुबाजूंच्या गावांमध्ये शिरलंय.
कोकणात येत्या चोवीस तासात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पडणार्या मुसळधार पाऊसामुळे खेड तालुक्यातल्या नारंगी नदीलाही पूर आलाय. या पुरामुळे खेड तालुक्यातली अंतर्गत वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पावसामुळे शाळा कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे.
कोल्हापुरात मुसळधार
कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आलंय. शिंगणापूर पुलावरून एक जीप वाहून गेल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चंदगड, गगनबावड्यासह धरणक्षेत्रामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तर विर्दभात गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 48 तासात पावसाची संततधार सुरुच आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या पर्लकोटा नदीला पूर आलाय. त्यामुळे भामरागडला जिल्ह्याशी जोडणारा 100 फूट पूल पाण्याखाली गेलाय. नदीकिनार्यावरच्या गावांना पुराचा धोका निर्माण झालाय.