'ही तर नाटकं सुरू पण पिक्चर अभी बाकी हैं' - उद्धव ठाकरे

'ही तर नाटकं सुरू पण पिक्चर अभी बाकी हैं' - उद्धव ठाकरे

येत्या लोकसभा निवडणुकीत श्रीनिवास वनगा हेच शिवसेनेचे पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार असणार असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे.

  • Share this:

पालघर, 07 जून :  'आता नाटकं सुरू आहेत पण पिक्चर अभी बाकी हैं' असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसंच पालघर पोट निवडणूक साम दाम दंड भेद यांच्या विरुध्द अशीच झाली. आपण त्यांना घाम फोडला असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आज शिवसेनेची पालघर जिल्ह्यातील तलासरी इथं आभार सभा आयोजित करण्यात होती. या सभेला उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं, यावेळी त्यांनी भाजपवर एकच हल्लाबोल केला.

पालघर लोकसभा मतदारसंघ युतीत भाजपकडे आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत युती नाहीच हे स्पष्ट होतंय. म्हणजे येत्या लोकसभा निवडणुकीत श्रीनिवास वनगा हेच शिवसेनेचे पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार असणार असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. या निवडणुकाचा पराभव मला मान्य नाही. यात आपणच जिंकलो आहोत, असंही ते म्हणाले आहेत.

पालघर निवडणुकीतील पराभव मी खिळाडू वृत्तीने नाही आणि कोणत्याच परीने मान्य करायला तयार नाही. उन्हामुळे जर यंत्र बंद पडतील मग चाचण्या कसल्या घेतल्या. नाव गायब, बोगस मतदान, यंत्र बिघडली याला लोकशाही म्हणतात का? असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान, कालच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत युतीविषयी चर्चा करण्यात आली. पण उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भाषणातून अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची भेट व्यर्थ गेली असं म्हणायला हरकत नाही.

अमित शहा यांच्या भेटीनंतरची शिवसेनेची ही पहिली सभा होती. या सभेत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार आणि मंत्री तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी देखील उपस्थित होते.

First published: June 7, 2018, 7:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading