ईस्टर्न फ्री-वेच्या नावावरून मनसे-रिपाइंत जुंपली

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2013 10:55 PM IST

ईस्टर्न फ्री-वेच्या नावावरून मनसे-रिपाइंत जुंपली

bala nandgaonkar and ramdas athavale28 जून : मुंबईकरांच्या सेवत दाखल झालेल्या ईस्टर्न फ्री-वेला नाव देण्याच्या मुद्यावरुन आता राजकीय पक्षांत चांगलीच जुंपलीय. फ्री वेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या अशी मागणी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केलीय. तर, दुसरीकडे या मार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी याआधीच आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचा दावा आरपीआयच्या नेत्यांनी केला आहे.

मुंबईत पहिल्यांदाच सर्वात लांब पल्ल्याचा, टोल फ्री आणि सिग्नल फ्री असा ईस्टर्न फ्री वे महिन्याभरापुर्वीच मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला. नेहमी प्रमाणे कोणताही पूल, मार्ग तयार झाला तर त्याला नावं काय द्याचं यावरून राजकीय पक्षांची कुरघोडी सुरू होते. आताही तसंच काही घडलंय. पण यावेळेला मनसेनं शिवसेनेचा मुद्दा हायजॅक करत आपलं घोडं पुढे नाचवलं आहे. फ्री-वेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणीच मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी केली. नांदगावकर यांच्या मागणीमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

फ्री-वे झाल्यापासून याला नावं काय द्यावं याची चर्चा माझ्या कानी आली नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मोठे आहे, त्यांचा मला पूर्ण आदर असून मीही त्यांचा अनुयायी आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे झाला होता. तेंव्हा पु.ल.देशपांडे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी झाली होती पण या एक्स्प्रेस वेला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचं नाव देण्यात आलं. मुंबईतला फ्री-वे हा टोलमुक्त आणि लांबपल्ल्याचा आहे त्याला बाळासाहेबांचं नाव दिलं तर त्याचा योग्य सन्मान होईल अशी मागणी नांदगावकर यांनी केली. तसंच रिपाईच्या नेत्यांनीच माघार घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केली.

मात्र, नांदगावकर यांची मागणी फेटाळून लावत रिपाई नेत्यांनी एकच हल्लाबोल केला. मनसेची मागणी ही बुचकळ्यात टाकणारी आहे. रेसकोर्सच्या हिरवळीवरून बाळासाहेबांचं नाव एखाद्या डांबरी रस्त्यावर आणणं हे उचित ठरणार नाही. ज्यावेळेस फ्री वे पूर्ण तयार झाला होता. तेंव्हा रामदास आठवले यांनी फ्री-वेला डॉ.आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी सर्वात प्रथम मुख्यमंत्र्यांकडे केली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही हीच मागणी केली होती पण अचानक मनसेनं मागणी केल्यामुळे बुचकळ्यात टाकलंय अशी प्रतिक्रिया आरपीआयचे नेते अर्जुन डांगळे यांनी दिली. आरपीआय सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसनंही फ्रीवेला आंबेडकरांचं नाव देण्याच्या मागणीचं समर्थन केलंय. बाळा नांदगावकर यांनी आपली मागणी मागे घ्यावी असं आवाहनच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2013 10:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...