कोल्हापूर 21 जून : सीरिअल किलर प्रकरणी दोन अधिकार्यांना निलंबित करण्यात आलंय. त्यांच्यावर तपासात कुचराई केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. पोलीस निरीक्षक रतनसिंग राजपूत आणि उपनिरीक्षक अशोक कांबळे अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकार्यांची नावं आहेत.
कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव यांनी ही कारवाई केली. दोघंही निलंबित अधिकारी शाहुपुरी पोलीस ठाण्याचे आहेत. गुरूवारी पोलिसांनी या प्रकरणी दिलीप लेहरिया या तरुणाला अटक केली असून त्यानं 2 खूनांची कबुली दिलीय. दिलीप लेहरिया हा मुळचा छत्तीसगड मधला असून तो गेली 11 महिने कोल्हापूरमध्ये वास्तव्यास होता.
तोही एक भिकारीच असून भीक मागण्याच्या वादातून त्यानं इतर 2 भिकार्याचंे खून केल्याचं उघड झालंय. सोमवारी मध्यरात्री शहरातल्या टाऊन हॉल परिसरातून त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, लेहरिया याला जरी अटक करण्यात आली असली तरीही इतर खुनांचा तपास पोलीस करत आहे.