• ग्रेट भेटमध्ये अंजली भागवत - भाग 4

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Jan 18, 2009 01:02 PM IST | Updated On: Jan 18, 2009 01:02 PM IST

    ग्रेट भेटच्या 17 जानेवारीच्या भागात आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी ग्रेट इंडियन शूटिंग क्वीन अंजली भागवतची मुळाखत घेतली. गेली दोन दशकं अंजलीनं कर्तृत्वानं संपूर्ण देशाची मान अभिमानानं उंचावलीय. एकीकडे सचिन धावांचे डोंगर रचत होता तेव्हा अंजली एकापाठोपाठ एक गोल्ड मेडल्स मिळवत होती. आज तिच्या खात्यात 82 गोल्ड मेडल्स आहेत. अंजलीनं केवळ स्वत:चं नाव गाजवलं नाही, तर नेमबाजी हा खेळही भारतात रुजवला. आज भारतीय नेमबाजांची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे, त्यामागे अंजलीचे खूप मोठे परिश्रम आहेत. या मुलाखतीत अंजलीच्या व्यक्तिमत्वाचे विविध पदर उलगडले गेले.नुकत्याच झालेल्या बीजिंग ऑलिम्पिक्समध्ये अभिनव बिंद्रानं गोल्ड मेडल मिळवलं. या गोल्ड मेडलचा पाया अंजलीनं रचलाय. त्याबद्दल बोलताना अंजली म्हणाली "या क्षणाची मी खूप आतुरतेनं वाट पहात होते आणि त्याबद्दल भावना शब्दात व्यक्त करणं मला फार कठीण आहे. आमची खूप दिवसांची इच्छा होती की भारतीय खेळाडूला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळावं. फक्त शूटिंग असंच नाही, कोणत्याही खेळात चाललं असतं. म्हणजे आता आपण म्हणू शकतो की भारतीय खेळाडू हे करू शकतो. म्हणजे ऑलिम्पिक गोल्ड मेडल अशक्य नाही, ही भावना आता रुजू लागलीय. अभिनवनं हे खूप मोठं काम करून दाखवलंय. प्रत्यक्ष गोल्ड मेडलचा क्षण खूप टेन्शनचा होता. माझी तर नखं खाऊन खाऊन संपली होती. श्वास रोखून मी पहात होते आणि अभिनवनं तो शॉट खूप चांगला घेतला, त्याची रायफल थोडी बिघडली होती, पण त्यानं ते करून दाखवलं. तो दिवस अभिनवचा होता, भारताचा होता.आमच्यासाठी तो अत्यानंदाचा क्षण होता. आम्ही नाचत होतो, राष्ट्रगीत गाताना आमचे सगळ्यांचे डोळे पाणावले होते.""खरं तर मी सुरुवात केली तो काळ खूप कठीण होता. 1987-88 मध्ये आम्ही 7 मुली होतो. आमच्याकडे एकच रायफल होती . 50 मीटरची शूटिंग रेंज नव्हती. आहे ते टार्गेट कमी करून आम्ही सराव करायचो. आज एवढ्या दिवसांनी भारतीय नेमबाजीला मिळालेलं यश म्हणजे ठरवलं तर काहीही करता येतं." असं अंजली म्हणाली.भारतात क्रिकेटला जरा जास्तच प्रसिद्धी मिळते, असं म्हणलं जातं. पण अंजलीला त्याचं वाईट वाटत नाही. "मी देखील क्रिकेटवेडी आहे. क्रिकेट हा आपला धर्म आहे. मला अभिमान आहे की भारतात एक तरी खेळ इतका रिलिजियसली खेळला जातो. आणि तो पण असाच लोकप्रिय झाला नाही. क्रिकेट बोर्डानं त्यासाठी कष्ट घेतले, प्रोफेशनलिझम आणलं. इतर बोर्डांचं उदाहरण माझ्या मते सर्वांनी घेतलं पाहिजे. आपणही क्रिकेट वर्ल्ड कप जिंकले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्रिकेट हा प्रक्षकांच्या दृष्टीने फार चांगला खेळ आहे. नेमबाजी किंवा इतर खेळांची जर माहिती नसेल, तर ते बर्‍याचदा बोअरिंग वाटतात. म्हणूनही क्रिकेट जास्त लोकप्रिय आहे."अंजलीचं सगळं बालपण मुंबईत गेलं. मुंबई म्हणजे खरं तर क्रिकेटची पंढरी. अंजली अशा वातारणात वाढली जिथे नेमबाजीचं फारसं वातावरण नव्हतं. याविषयी बोलताना अंजली म्हणाली "असा काही खेळ आहे, याची मलाही अनेक वर्ष कल्पना नव्हती. मी एनसीसीत होते आणि तेही मला ट्रेकिंगची आवड होती, म्हणून. त्यात शूटिंगचं प्रशिक्षण कम्पल्सरी होतं. पहिल्याच दिवशी माझ्या सगळ्या गोळ्या वॉश आऊट गेल्या. मी आणि माझी मैत्रिण दीपाली देशपांडे यांनी असं ठरवलं की उद्या परत इथे यायचं नाही. पण आम्हाला परत तिथे यावच लागलं. आणि मग पुढे ही आवड डेव्हलप होत गेली. खेळातच करियर करायचं असंही मी काही ठरवलं नव्हतं. पण मला फक्त अभ्यासात करियर करायचं नव्हतं. एका जागी बसण्याची माझी फारशी तयारी नव्हती. कदाचित माझा खेळांकडे कल असावा, त्यामुळे माझं कॉन्सन्ट्रेशन जास्त चांगलं असावं. पुढे एनसीसी कॅम्पमध्येच भिष्मराज बाम सर भेटले. त्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही महाराष्ट्र राज्याकडून नॅशनल चॅम्पियनशिपला चलावं. गंमत म्हणून चला, पण चला असं ते म्हणाले. त्यांनाही अशा मुलींची गरज होती. आमचा सगळा ग्रुप होता आणि फक्त पिकनिक म्हणून अहमदाबादला गेलो. मॅच मात्र मी फार सिन्सिअरली खेळले आणि कसं ते मलाही माहीत नाही, पण मला सिल्व्हर मेडल मिळालं. तेही केवळ सात-आठ दिवसांच्या प्रॅक्टिसवर. फक्त बंदूक म्हणजे काय, एवढच माहीत होतं. महाराष्ट्राच्या कोणत्याही नेमबाजाला पहिल्यांदाच पदक मिळालं. मग कॉलेजमध्ये माझा सत्कार झाला, एनसीसीत सत्कार झाला, पेपरमध्ये फोटो आले. घरचे सगळे खुश होते. मग मी सराव सुरू केला. तेव्हाही पुढे मी या जागेवर असेन, याची मला कल्पना नव्हती. माझं लक्ष इतर उद्योगातच जास्त असायचं. पण निदान अर्धा तास तरी आम्ही सराव करायचोच. खरं मार्गदर्शन मिळालं ते संजय चक्रवर्ती सरांकडून. ते नेव्हीत होते आणि पुढे महाराष्ट्राकडून खेळायचे. ते रिटायरमेन्टला आले होते. मग पुढे काय, तर त्यांनी त्यांच्या अनुभवातून ते आम्हाला शिकवायला लागले. मग मला त्यात आनंद मिळायला लागला, खेळ आवडायला लागला. कळलं की किती चांगला खेळ आहे हा. फक्त शारीरिक नाही, तर मानसिक बळकटीही लागते. आणि बंदूक हातात धरण्याचं थ्रीलही असतंच. मग मी त्यातच करियर करायचं ठरवलं.""नेमबाजीनं माझी पर्सनॅलिटी चेंज झाली. आधी मी खूप चंचल होते. पण या खेळानं मला फोकस दिला, आत्मविश्वास दिला. म्हणजे माझ्या नॉलेजमुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि हेच मला करायचंय हे देखील ठरलं" असं अंजली म्हणाली.अंजलीनं प्रक्टिसला सुरुवात केली तेव्हा सरावासाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या. "तेव्हा परिस्थिती अगदीच बीकट होती. वरळीला शूटिंग रेंज म्हणजे चार खांब होते आणि पत्र्याचं छप्पर होतं. 7-8 जणींमध्ये 2 रायफल्स होत्या. त्याही चालल्या तर चालल्या अशी अवस्था होती. पणत्यात चांगली गोष्ट म्हणजे आम्ही 7-8 जणी एकत्र होतो, आमच्या आवडी-निवडी जुळत होत्या म्हणून ते सुरू राहिलं. मी एकटीच असते, तर हे अवघड झालं असतं. बाम सर, संजय सरांची खूप मदत झाली. आणि एनसीसीनं जे गुण अंगी भिनले होते, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ध्येय गाठायचं, त्याचा फायदा झाला. आमच्याकडे गोळ्या नव्हत्या. आम्ही फक्त होल्डिंग प्रॅक्टिस करायचो. म्हणजे काय ? तर आम्ही बंदूक हातात घ्यायचो आणि मेन्टली विचार करायचो की मी आत्ता शूट केलं तर काय होईल... याला ड्राय पॅ्रक्टिस म्हणतात. मग स्पर्धेच्या वेळेस बाम सर कुठून तरी पैसे जमवून आम्हाला नॅशनल प्रॅक्टिसला पाठवायचे. आणि त्यातही आम्ही बर्‍यापैकी कामगिरी करायचो. आणि बाम सर स्वत:चा एवढा वेळ द्यायचे, भरपूर मदत करायचे. मग आम्हालाही वाटायचं की काहीतरी करून दाखवलं पाहिजे." या काळात टिकून रहाणं सोपं नव्हतं. "कधीकधी खूप नैराश्य यायचं. हे का आणि कशाला करतोय ? असा प्रश्न पडायचा. पण आम्ही आमचं रँकिंग त्या काळातही टिकवून होतो. तेव्हा बंगालच्या मुलींच वर्चस्व होतं. सोमा दत्ता ही बंगालची शूटर स्वत: जर्मनीला रहायची. तिथून ती इकडे मदत करायची. आम्ही त्या काळात मुद्दाम त्यांच्या मागे बसायचो. ते काय विचार करतात, काय साधनं वापरतात, हे आम्ही बघायचो. त्यांच्यासाठी आम्ही गिनिपिग होतो. माझ्या करियरची जवळपास 10 वर्ष अशी गेली. ती मिळाली असती, तर कदाचित मी अजून पुढे गेले असते. पण मला जेवढं नुकसान झालं, तेवढाच माझ्या खेळाला फायदा झाला. कारण कोणी ना कोणी हे करायलाच हवं होतं. आम्ही जर सुरुवात केली नसती, तर आज हा खेळ इथपर्यंत पोहचलाच नसता. नंतर माझी भेट हायको प्रॉडक्ट्सच्या मंगला अभ्यंकर भेटल्या. त्या दर वर्षी खेळाडूंना स्कॉलरशिप द्यायच्या. त्यांनी दिलेल्या मदतीतून 1993-1994 ला मला माझी पहिली रायफल मिळाली. मग माझा आलेख चढत गेला. आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा तर आम्ही विचारच करू शकत नव्हतो. कारण गोळ्याच खराब असतील, बंदूकच वाकडी असेल, तर काय करणार ? 1995 ला मी पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळले. साउथ एशियन गेम्स जे मद्रासला झाले, त्यात मी खेळले. आणि सुदैवानं पहिल्याच स्पर्धेत मला 3 गोल्ड, 2 सिल्व्हर आणि 2 ब्रॉन्झ मेडल्स मिळाली. सॅप रेकॉर्डही झालं. तेव्हा मी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धा, खेळाडू बघितले. आंतरराष्ट्रीय पोझिशन्स, कपडे, रायफल्सच्या ऍडजस्टमेन्ट हे सगळं बघता आलं. पण हे काही माहीत नसतानाही आम्ही त्यांना चांगली लढत दिली. मेडल्सही मिळवली. तिथे मला खूप आत्मविश्वास मिळाला." असं अंजलीनं सांगितलं.कोणत्याही खेळाडूची इच्छाशक्ती आणि मेन्टल प्रिपरेशन खूप महत्वाचं असतं. त्याबद्दल अंजली म्हणाली "आमचं जे मेन्टल ट्रेनिंग होतं, ते खर्‍या प्रॅक्टिसपेक्षा महत्त्वाचं होतं. कारण प्रॅक्टिसमध्ये आम्ही फक्त बंदूक हातात घ्यायचो. कारण चालवायला गोळ्याच नव्हत्या. कारण शेवटच्या क्षणी तुम्ही जेव्हा एकाग्रता साधता, तेव्हा जगातले सारे विचार तुम्हाला पकडायला येतात. मग ते कसे थाबवायचे किंवा ते जबरदस्ती थांबवायला गेलो तर त्याचा उलटा परिणाम होतो. मग ते कसे स्वाकारावे, हे पण आम्ही शिकलो."1995 मध्ये मीडियानं अंजलीबद्दल 'स्टार इज बॉर्न' असं लिहिलं. 2002 हे तिच्या कारकीर्दीतलं सर्वोत्कृष्ट वर्षं. त्याबद्दल ती म्हणाली "हळूहळू सरकारला जाग आली. आमच्या परफार्मन्सचे रिझल्ट्स वर पाठवले. त्यावेळी नाना पाटेकर यांनी खूप मदत केली. खेळाचं कोणतच साहित्य इथे मिळत नव्हतं. आणि ते खूप महागही होतं. मग आमच्यातल्या काही मुलींना त्यांनी स्पॉन्सर केलं. पण तरीही आम्ही कुठेतरी कमी पडत होतो. राष्ट्रकुलची मेडल्स 3-4 गुणांच्या फरकांनी हुकत होतं. त्यावेळेस आम्ही सरकारकडे मागणी केली की आम्हाला फॉरेन कोच आणा. कारण हा खेळ आपल्याकडे नवीन होता. लोकांना फक्त पुस्तकी प्रशिक्षण होतं. भांडत भांडत शेवटी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाला जाग आली आमि 1998 मध्ये त्यांनी लास्‌लो यांना आणलं. ते मलेशियाचे कोच होते. कधीकाळी मलेशियातल्या नेमबाजांची अवस्था पण आपल्यासारखीच होती. पण त्यांनी एका वर्षात आमच्यासमोर कॉमनवेल्थ जिंकली होती. ते हंगेरियन कोच होते आणि त्यांनी भारतातली नेमबाजीची सर्व परिस्थिती बदलून टाकली. ते स्वत: खूप चांगले कोच आहेत. त्यांनी आम्हाला जो प्रोफेशनल गायडन्स दिला, त्याच्यामुळेच मी ऑलिम्पिकपर्यत पोहचू शकले. मी त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास टाकला. म्हणजे सगळं ज्ञान असलं तरी मी परफॉर्म करू शकेन का नाही ? अशी शंका असते. पण असा कोच असला की एक खात्री असते की माझं काहीही बिघडलं तरी, तो सावरू शकेल. आणि मग मी खेळावर पूर्ण फोकस करू शकले."लास्‌लो यांच्याविषयी अंजली खूप कृतज्ञ आहे. "आल्या आल्या त्यांनी सांगितलं की हे जे काही कार्टूनसारखे कोट्स आणि ट्राउझर्स घातलेत, ते पहिले काढून टाका. खूप पाठपुरावा करून त्यांनी आमच्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची जॅकेट्स मागवले आणि मग ते घातल्यावर आम्हाला कळलं की त्यानी किती चांगला बॅलन्स मिळतो. त्यांनी आम्हाला बेसिकपासून शिकवलं. म्हणजे श्वासावर कसा कंट्रोल ठेवावा, ट्रिगर खेचताना किती स्टेजेस असतात वगैरे वगैरे. आमचा स्टॅमिना आमि जिद्द खूप चांगली होतीच. त्यांच्या 3 ते 4 महिन्यांच्या प्रोफेशनल ट्रेनिंगनंतर आमची कामगिरी प्रचंड सुधारली. वर्षभरात आम्ही कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप जिंकली. नंतरच्या वर्षात मी सगळ्या स्पर्धा जिंकले आणि ऑलिम्पिकला क्वालिफाय झाले. त्यांनी आम्हाला आंतरराष्ट्रीय शूटर्सचे व्हिडिओ दाखवले. पोझिशन्स कोणत्या, आपल्याला त्यातल्या कोणत्या सूट होतात, बॉडी बॅलन्स म्हणजे काय, बॉडी झिरो म्हणजे काय, टार्गेट सेन्टरला कसं ठेवायचं, या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या."ज्या खेळाचं ज्ञान आपल्याला नाही, त्यासाठी खोटा अभिमान न बाळगता फॉरेन कोच आणायला हरकत नाही, असं मत अंजलीनं व्यक्त केलं. "आज आपल्याकडे मी आहे, सुमा शिरूर, दीपाली देशपांडे, जसपाल राणा, अभिनव बिंद्रा आहे. आज फॉरेन कोचची गरज नाही, पण तेव्हा होती. आपल्याकडे रामायण महाभारतापासून धनुर्विद्या आहे, मग आम्ही पण आर्चरीमध्ये गोल्ड मेडल मिळवू शकतो, या विधानाला काही तथ्य नाही."सिडनी ऑलिम्पिकच्या अनुभवाविषयी अंजली म्हणाली "मी त्या वेळेस वर्ल्ड कप लेव्हला पोहचले होते, पण मेडल नव्हतं. माझ्या परफार्मन्समध्ये सातत्य होतं, पण तरी मी ऑलिम्पिकपर्यंत क्वालिफाय होईन, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मला 15 दिवस आधीपर्यंत देखील मी तेथे खेळेन, अशी मला कल्पना नव्हती. पण मला ऑलिम्पिक समितीचं पत्र मिळालं की मला वाईल्ड कार्ड मिळालंय. तेव्हा मला ऑलिम्पिकमध्ये खेळण्यापेक्षाही ऑलिम्पिकमध्ये जाण्याचं जास्त अप्रुप होतं. त्यानंतर माझी कामगिरी सुधारत गेली आणि ऑलिम्पिकमध्ये मी सातवी आले. पण माझी कामगिरी सुधारत असताना अचानक लास्‌लो यांचं कॉन्ट्रॅक्ट वाढवलं गेलं नाही. मग माझी अवस्था अशी झाली की मी रॉ खेळाडू पण नाही आणि पूर्ण प्रशिक्षित पण नाही. आम्ही सरकारशी खूप भांडलो आणि 2004 मध्ये लास्‌लो यांना परत आणलं गेलं. आणि मग आमची कामगिरी परत सुधारत गेली. जर मी पूर्ण भरात असताना मला चांगला कोच मिळाला असता, तर कदाचित मी एखादं मेडल तर नक्कीच आणलं असतं. गोल्डची मी खात्री देत नाही. कारण त्या ठराविक दिवशी तुमची कामगिरी कशी होते, तुमचा मेन्टलिटी कशी असते ? यावर ते अवलंबून असते, पण किमान एक मेडल तर मी मिळवलंच असतं. 2003 मध्ये मी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकले होते, म्हणजे पुढच्या 7-8 महिन्यात मला फक्त माझा परफार्मन्स मला कायम ठेवायचा होता. माझा तसा कॉन्फिडन्सही होता. पण ऑलिम्पिकच्या दिवशी तुम्हाला तयार करण्यासाठी एका प्रोफेशनल गायडन्सची गरज असते, तो मला मिळाला नाही. सरकारच्या हलगर्जीपणामुळे फक्त माझंच नाही, तर माझ्यासारख्या अनेक ऍस्पायरिंग नेमबाजांचं नुकसान झालं."200 साली अंजलीचं लग्न झालं. त्यानंतर अंजलीचं करियर बहरत गेलं. त्याबद्दल बोलताना अंजली म्हणाली "घरातून पूर्ण सहकार्य असल्याशिवाय पूर्ण परफॉर्मन्स देता येत नाही. मला सुदैवानं माझ्या आई-वडिलांचा आणि नंतर माझा नवरा, सासू-सासरे यांचा पूर्ण सपोर्ट मिळाला. लग्न झालं, त्यावेळेस माझे कोचही नव्हते. त्यामुळे मला घरच्यांचा सपोर्टचा खूप उपयोग झाला."राजीव गांधी खेलरत्न अंजलीला देण्यावरून खूप वाद झाले आणि अखेर तो अंजलीला मिळाला. तो अंजलीचा खरं तर हक्कच होता. त्याबद्दल बोलताना अंजली म्हणाली "राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा देशातल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूला दिला जातो. माझा बेसिक प्रश्न हा होता की या पुरस्कारासाठी खेळाडूला अर्ज का करावा लागतो ? तुमच्या देशातल्या सर्वोत्कृष्ट खेळाडू तुम्हाला माहीत असायलाच हवा. त्यावरून गरेच वाद झाले. माझा अर्ज रद्द केला गेला. पण मी ठरवलं की आपल्या हक्कांसाठी मला लढायलाच हवं. मी लढले म्हणून कोच आला, मी लढले म्हणून आम्हाला आधुनिक साहित्य मिळालं. आणि माला पुरस्कार मिळाला तर ती ज्युनियर खेळाडुंसाठी प्रेरणाठरेल. प्रत्येक वर्तमानपत्रात मला मिळालेली मेडल्सची संख्या आली होती. मग तो मेसेज समितीपर्यंत पोहचला आणि मला पुरस्कार मिळाला."अंजलीनं आत्तापर्यंत 3 ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतलाय. त्याबद्दल बोलताना अंजली म्हणाली "पहिल्या ऑलिम्पिकमध्ये मी अगदीच रॉ होते. 2004 मध्ये माझा आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा होता. माझ्या स्वत:कडून खूप अपेक्षा होत्या. देशाच्या खूप अपेक्षा होत्या. पण कुठेतरी प्रोफेशनल ट्रेनिंगमध्ये कमी राहिली, असं मला वाटतं. 2004 मध्ये लास्‌लो परत आले, पण तोपर्यंत टेक्निकली जग खूप पुढे गेलं होतं. ते भरून काढायला खूप वेळ गेला. बीजिंग ऑलिम्पिक म्हणजे माझ्यासाठी बोनस होता. पण पहिली उमेद आता फारशी राहिली नव्हती. पण या ऑलिम्पिकसाठी मला खूप मदत मिळाली. सरकारबरोबर कॉर्पोरेट्सचीही मदत झाली. मित्तल चॅम्पियन ट्रस्ट, ह्युंदाई मोटर्सनी मदत दिली. रिलायन्स कम्युनिकेशननी आम्हाला नोकर्‍या दिल्या. पण जो क्षण गेला, तो परत नाही मिळू शकणार."आता अंजली फक्त खेळाडू म्हणून नाही तर कोच म्हणूनही काम करते. त्याबद्दल अंजली म्हणाली "मी जिथून सुरुवात केली आणि आज जे चित्र दिसतंय, त्यात नक्कीच सुधारणा झाली. पहिल्यांदा काही आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यानंतर माझ्या नवर्‍यानं - मंदारनं मला मीडियाकडे जायला प्रवृत्त केलं. मग खेळालाही प्रसिद्धी मिळत गेली आणि त्याचा फायदाही झाला. कधी काळी नॅशनल चॅम्पियनशिपला 30-40 स्पर्धक असायचे. आता मुंबईतल्या स्पर्धेलाही 500 ते 600 स्पर्धक मिळतात. पण तरीही ऑलिम्पिक लेव्हलच्या परफॉर्मन्ससाठी आपल्याला बरीच मजल मारायचीय. पण मला असं वाटतं की आपल्या देशात एखादा खेळाडू मोठा होतो आणि मग तो खेळ प्रसिद्ध होतो. असे बरेच खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले जातात, पण त्याबद्दल आपल्या देशातील खेळाडूंना माहितीच नसते. अगदी उमेदीच्या काळात खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळालं, तर बराच फरक पडू शकेल."भविष्यात नवीन खेळाडू घडवण्याची अंजलीची इच्छा आहे. त्याबद्दल अंजली म्हणाली "जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत माझ्या देशासाठी मी खेळत राहीनच. शिवाय मला आजपर्यंत या देशानं जे काही दिलं, ते मला देशाला परत करायचंय. माझ्या देशासाठी माझा अनुभव वापरून भावी नेमबाज घडवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. मी पुण्यात त्यासाठी एक छोटीशी अकादमी स्थापन केली आहे. मला एक चांगली कोच बनून चांगले खेळाडू घडवायचे आहेत. जर तुमच्याकडे जिद्द असेल, आत्मविश्वास असेल आणि त्यासाठी बाकी सगळं बाजूला ठेवायची तयारी असेल तर कोणीही क्रीडा क्षेत्रात करियर घडवू शकतं"या मुलाखतीचा शेवट करताना निखिल वागळे म्हणाले "अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत अंजलीनं असा खेळ निवडला जो देशाला माहीतही नव्हता आणि 20 वर्षात तिनं तो खेळ लोकप्रिय करून दाखवला. जिद्द, आत्मविश्वास आणि कठोर मेहनत या जीवावर असाध्य कसं साध्य होऊ शकतं, याचं अंजली हे मुर्तिमंत उदाहरण आहे."

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading