सोलापूर जिल्ह्यातही ऊस दराचं आंदोलन पेटलं...

सोलापूर जिल्ह्यातही ऊस दराचं आंदोलन पेटलं...

सोलापूर जिल्ह्यातही आता ऊस दराचं आंदोलन तीव्र होताना दिसतंय. ऊसदराच्या मागणीसाठी आंदोलकांनी पंढरपूर तालुक्यातील सोनके इथं लाकडाची ओंडकी जाळून रास्ता रोको आंदोलन केलं. तर भाळवणीत एसटीची तोडफोड केली. माढा तालुक्यातही रस्त्यावर टायर जाळण्यात आले.

  • Share this:

19 नोव्हेंबर, सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातही आता ऊस दराचं आंदोलन तीव्र होताना दिसतंय. ऊसदराच्या मागणीसाठी आंदोलकांनी पंढरपूर तालुक्यातील सोनके इथं लाकडाची ओंडकी जाळून रास्ता रोको आंदोलन केलं. तर भाळवणीत एसटीची तोडफोड केली. माढा तालुक्यातही रस्त्यावर टायर जाळण्यात आले. 9 दिवसांपासून शेतकऱ्यांचं उपोषणही सुरू आहे. पण तरीही राज्याचे सहकारमंत्री आणि सोलापुरातले साखर कारखानदार सुभाष देशमुख हे आंदोलकांना प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळेच हे आंदोलन उग्र होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केलाय.

राज्यकर्ते आणि साखर कारखानदारांचं साटंलोटं असल्यानेच सोलापूर जिल्ह्यात ऊस दराचा प्रश्न पेटला असून, वेळेत त्यावर तोडगा काढला गेला नाहीतर नगर जिल्ह्यासारखी पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही, असा इशाराच रविकांत तुपकर यांनी दिलाय.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात ऊस दराचा प्रश्ना मार्गी लागला पण सोलापूर जिल्ह्यात नेतेमंडळीच साखर कारखानदारांना पाठिशी घालत असल्यानेच शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागतं. जिल्ह्यातले कारखानदार ऊसाला जास्त भाव द्यावा लागू नये, म्हणून रिकव्हरी कमी दाखवतात, काटा मारतात, हे सरकारही अशा साखर कारखानदारांना पाठिशी घालतंय. असंही रविकांत तुपकर यांनी म्हटलंय.

दरम्यान, काल परवाही आंदोलक शेतकऱ्यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलनाचा प्रयत्न केला पण पोलिसांनी दडपशाही केल्याने आंदोलकांनी रक्ताची पिशवीच अंगावर फोडून सहकारमंत्र्यांच्या दारात रक्ताचा सडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण तरीही साखर कारखानदार असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख ऊस दराच्या प्रश्नावर कोणतीच भूमिका घेताना दिसत नाहीत.

First published: November 19, 2017, 6:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading