मुंबई, 15 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळी परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील दुष्काळामुळे तयार झालेल्या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली आहे.
'सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात 1972 पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्हयांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपूर्ण दुष्काळी भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत,' अशी मागणी करणारे पत्र शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे.
दरम्यान, राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्याची वेळही शरद पवार यांनी पत्राद्वारे मागितली आहे. शरद पवार यांनी लोकसभेचा रणसंग्राम संपताच सोलापूर, सातारा, बीड, उस्मानाबाद, अहमदनगर या दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. पवारांनी थेट शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जात आणि चारा छावण्यातील शेतकऱ्यांच्या, मालकांच्या अडचणीही जाणून घेतल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चाही करणार
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या संदर्भात शरद पवार आज सायंकाळी 8 वाजता मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहेत. यावेळी ते दुष्काळग्रस्त्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडतील.
VIDEO : सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द, कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तरुणाला चोप