• 'बंटी-बबली'ची खुनी जोडी !

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Apr 19, 2012 05:34 PM IST | Updated On: Apr 19, 2012 05:34 PM IST

    19 एप्रिलमुंबईमध्ये एका जेष्ठ नागरिकाची हत्या होते. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक होते. आणि जेव्हा प्रकरणाचा तपास पुढे सुरु होतो, तेव्हा समोर येते गुन्ह्यांची एक संपूर्ण मालिका. कुठल्याही थ्रिलर सिनेमातलं वाटावं असं हे गंभीर प्रकरण आहे. आणि या खर्‍याखुर्‍या कहाणीतले व्हिलन आहेत विजय पलांडे आणि सिमरन सूद. या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट मॅच फिक्सिंग, बॉलीवूड आणि अंडरवर्ल्ड संबंध इथपर्यंत पोचले आहे. नाव : विजय पलांडे..पैसा... पैसा... आणि आणखी पैसा...फक्त पैसा हेच एक स्वप्न विजयनं आयुष्यभर बघितलं. ते पूर्ण करण्यासाठी कुठल्याही थराला जायची त्याची तयारी होती. एका पाठोपाठ एक खून करायचे आणि पैसा लुटायचा हाच त्याचा धंदा झाला. या कामी त्याच्या मदतीला होती त्याची बायको.. आणि काही छोटेमोठ्‌या भूमिका करणारी सिमरन सूद..मुंबईतल्या अरुणकुमार टिक्कू हत्येप्रकरणी विजय पलांडेला अटक झाली आणि त्याच्या कृष्णकृ त्यांची मालिकाच समोर आली. श्रीमंत पण बॉलीवुडमध्ये स्ट्रगलर असलेल्या अनुज टिक्कूच्या फ्लॅट आणि गाडीवर विजयची नजर होती. यातूनच त्याने अनुजचे वडील अरुणकुमार यांचा खून केला. या प्रकरणात त्याला अटक झाली. त्याच्या चौकशीतून आणखी एका हत्याप्रकरणाचा खुलासा झाला. ही हत्या होती एका नवोदित निर्मात्याची... करण कक्करही गर्भश्रीमंत. त्याच्याही संपत्तीवर विजयची नजर.. यातूनच त्याने करणची हत्या केली. आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते जंगलात पुरले. या कामी त्याला मदत केली सिमरन सूदनं. चौकशी दरम्यान सिमरननं कधी आपण विजयची मैत्रीण, कधी बहीण तर कधी पुतणी असल्यायचं सांगितलं. पण ती विजयची बायको असल्याचं आता स्पष्ट झालंय. या प्रकरणाला आता आणखी नवं वळण लागलंय. सिमरनचे काही क्रिकेट बुकींशीही संबंध असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं आहे. याशिवाय बॉलीवुड आणि अंडरवर्ल्डशी त्यांचा संबंध आहे का याचाही तपास पोलीस करत आहे. त्यामुळे या प्रकरणात अजून कोणकोण अडकतं, ते तपासातून स्पष्ट होईल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी