• होम
  • व्हिडिओ
  • मंत्रिमंडळ, स्वत:ची बँक असलेली अफलातून शाळा !
  • मंत्रिमंडळ, स्वत:ची बँक असलेली अफलातून शाळा !

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Nov 13, 2011 03:59 PM IST | Updated On: Nov 13, 2011 03:59 PM IST

    दीप्ती राऊत, नाशिक 13 नोव्हेंबरनाशिक जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुलांनी आता स्वत:च्या हक्कांची स्वत:च अंमलबजावणी सुरू केली. त्यांना पाठबळ मिळालंय ते लोकविकास सामाजिक संस्थेचं आणि मेलजोल अभियानाचं."आम्ही नाशिक जिल्हा परिषदेच्या विनायक नगरचे विद्यार्थी शपथ घेतो की आम्ही आमच्या शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असू... आम्ही आमच्या पदाचा दुरुपयोग करणार नाही...." हा आगळावेगळा शपथग्रहण सोहळा संपन्न झाला नाशिकमधल्या विनायकनगरच्या शाळेत. विद्यार्थ्यांच्या या मंत्रिमंडळाला शपथ देताहेत त्यांचे तोत्रे सर. 14 मंत्र्यांच्या या मंत्रिमंडळाची निवडही गुप्त मतदान पद्धतीने झाली.मतदान अधिकारी मतदाराचे नाव पुकारतो. मतदार विद्यार्थी येतो, हातावर शाई लावली जाते, मतदार सही करतो आणि मतदान कक्षामागे जाऊन मतदान करतो. विद्यार्थ्यांनी निवडलेले हे मंत्री त्यांचं कामही चोख करतात.परिपाठ मंत्री शोभा खोटरे म्हणते, मी शाळेचा रोज परिपाठ, प्रतिज्ञा, राष्ट्रगीत घेते. पोषण आहार मंत्री जगन खोटरे म्हणतो, पट्‌ट्या घालणे, मुलं जेवतात का यावर लक्ष देणे ही कामं मी करतो.सर्वात जबाबदारीचे काम आहे ते अर्थमंत्र्यांचं. या चिमुकल्या मंत्रिमंडळाने शाळेत चक्क अफलातून बँक सुरू केली. विद्यार्थी त्यांच्या खाऊच्या पैशातून बचत करून या अफलातून बँकेत भरतात. त्यासाठी डिपॉझीट स्लीप भरतात, पासबुक अपडेट करतात. विशेष म्हणजे या बँकेत पैसे काढण्यासाठी व्हिड्रॉव्हल विंडोजवळ रांग लावावी लागत नाही. या अफलातून बँकेचे एटीएमही तेवढंच अफलातून आहे.अर्थमंत्री सागर महाले म्हणतो, मुलं त्यांचे खाऊचे पैसे यात जमा करतात. त्यातून आम्ही वह्या पुस्तकं घेतो. पेन घेतो पासबुक, खातेवही लिहितो.या बचतीतून या विद्यार्थ्यांनी थेट अजंठा वेरुळची सहलही केली. इतकंच नाही तर पाचवीतल्या विद्यार्थ्याचा हात खेळताना फ्रॅक्चर झाला तर तेव्हा त्याला उपचारांसाठी या अफलातून बँकेनं कर्जही दिलं. यात सर्वात जास्त उत्साह आहे तो तोत्रे सरांचा..शिक्षक शरद तोत्रे म्हणतात, या मुलांना बसमध्ये बसणंही दुरापास्त आहे एवढी इथली परिस्थती बिकट आहे. या उपक्रमांमधून आम्हाला मुलांचा सर्वांगिण विकास साधता येतो.खरं तर सध्याच्या इंटरनॅशनल शाळांच्या झगमगाटात हे उपक्रम फिके वाटतील, पण पायात चप्पलही नसलेल्या, डोंगरदर्‍यात वसलेल्या या आदिवासी विद्यार्थ्यांची ही हुशारी, त्यांच्यासाठी धडपडणारे शिक्षक आणि त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या लोकविकास आणि मेलजोल सारख्या संस्था सारेच अफलातून..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading