S M L
  • कोण होता गद्दाफी ?

    Published On: Oct 20, 2011 05:13 PM IST | Updated On: Oct 20, 2011 05:13 PM IST

    मुअम्मर गद्दाफी नेमका होता कसा ? वयाच्या 27 व्या वर्षी सत्ताधीश होणा-या या व्यक्तीच्या अनेक छटा होत्या. एकीकडे त्याने बाँब हल्ले करून लोकांचे जीव घेतले. तर दुसरीकडे मृतांच्या नातेवाइकांना मोबदला देऊन माफीही मागितली. एकीकडे दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिला. तर दुसरीकडे अलकायदा विरोधी लढाईत सहभागीही झाला. मुअम्मर अल-गद्दाफी. लिबियावर 42 वर्ष एकहाती सत्ता गाजवणारा हा हुकूमशाह. 7 जून 1942 च्या दिवशी सिर्तेच्या वाळवंटात कधाध्फा नावाच्या टोळीत जन्माला आला. त्याचं प्राथमिक शिक्षण मद्रशात झालं. पुढे बेंगाझीतल्या लिबियन मिलिटरी अकादमीमधून त्यानं लष्करी शिक्षण घेतलं. वयाच्या केवळ 27 व्या वर्षी त्यानं लिबियाचा राजा इदि्रसविरुद्ध क्रांती करून त्याची सत्ता उलथवली. 1 सप्टेंबर 1969 च्या त्या दिवसापासून त्यानं लिबियात मर्यादित अर्थानं समाजवाद आणला. मोठे उद्योगधंदे सरकारी नियंत्रणाखाली आणले. त्याने आणलेल्या काही सुधारणांमुळे लिबियाची आर्थिक स्थिती काही प्रमाणात सुधारली. अलिप्ततावादी चळवळीत भाग घेतल्यामुळे त्याचे भारताशी चांगले संबंध होते. पण त्याच वेळी त्यानं राज्यघटनेला बरखास्त करून देशाचं इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्याचा अरब राष्ट्रवादावर विश्वास होता. उत्तर अफ्रिकेतल्या अरबी राष्ट्रांना एकत्र करण्याचं त्याचं स्वप्न होतं. पुढे त्यानं अमेरिका आणि युरोपीय देशांना विरोध करण्याचं धोरण अवलंबवलं. तसेच 1972 पासून त्यानं महासंहारक शस्त्रास्त्र गोळा करण्याचा घाट घातला. त्यामुळे अमेरिकेने लिबियावर अनेक निर्बंध लादले. गद्दाफीने पॅलिस्टाईन आणि आयरिश रिपब्लिकन आर्मीला मदत केली. 1986 साली त्यानं जर्मनीतल्या बर्लिन नाईट क्लबवर हल्ला करून 2 अमेरिकन सैनिक मारले. 1988 साली एका स्कॉटलँडच्या विमानावर गद्दाफीने बाँबहल्ला करून सुमारे 270 लोकांचे जीव घेतले. त्यानं आधी या हल्ल्यांचा इन्कार केला. पण काही वर्षांनंतर जबाबदारी स्वीकारली आणि मृतांना मोठा मोबदलाही दिला. त्यानंतर हळुहळू गद्दाफीचे अमेरिकेशी संबंध सुधारू लागले. 9/11 च्या हल्ल्यानंतर.. त्यानं अल कायदाविरोधात सुरू झालेल्या युद्धात त्यानं अमेरिकेची साथ दिली. संहारक शस्त्रास्त्र गोळा करण्याची मोहीमही त्यानं बंद केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची प्रतिमा थोडी उजळली. पण अरब जगतात मात्र गद्दाफी सर्वांना प्रिय नव्हता. विशेषतः सौदी अरेबियाशी त्याचे संबंध कमालीचे वाईट होते. गेल्या दहा वर्षांत गद्दाफीने अनेक राष्ट्रप्रमुखांना लिबियात बोलवून आंतरराष्ट्रीय समुदायात स्वतःचं प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अरब राष्ट्रांशी संबंध चांगले नसल्यामुळे त्यानं आफ्रिकेकडे मोर्चा वळवला. सर्व आफ्रिकनं राष्ट्रांना एकत्र करून युनायटेड स्टेट्स ऑफ आफ्रिका बनवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण हे सर्व सुरू असतानाच.. देशातली सर्वसामान्य जनता त्याच्या राजवटीला वैतागली होती, हे त्याच्या लक्षात आलं नाही. गद्दाफीची संपत्ती वाढत असताना लिबियाचे दरडोई उत्पन्न 2 डॉलरहूनही कमी होतं. चाळीस टक्के तरुणांकडे नोक-या नव्हत्या. आणि त्यामुळेच यावर्षीच्या सुरवातीला त्याच्या 41 वर्षांच्या सत्तेला ग्रहण लागायला सुरवात झाली. आणि त्यानंतर झालेल्या तुंबळ युद्धात त्याच्या सिर्तेच्या जन्मभूमीतच त्याचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close