13 डिसेंबर, मुंबईगोविंद तुपे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकिटासाठी आता रांगेत ताटकळत उभं रहावं लागणार नाही. कारण तिकीट बुकींग आता एटीएम सेंटरवर करता येणार आहे. रेल्वेनं हा प्रयोग सगळ्यात आधी मुंबईत सुरू केलाय. मुंबईतल्या सर्व 44 रेल्वे स्टेशनवर ही सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत आठ बँकांच्या एटीएम सेंटर्सचा यात समावेश करण्यात आलाय. या सोईचा सर्वसामान्य लोकांना नक्कीच फायदा होईल, असं रेल्वे प्रशासनाला वाटतंय.कॅनेरा बँकेच्या एटीएम सेंटरमधून तिकीट बुक करणारे सुनील कुमार सांगतात की रांगेत उभं रहावं लागत नाही. सुट्ट्या पैशाचा त्रास वाचतो. 24 तास कधीही तिकीट बुक करता येतं. या सेवेचा लाभ प्रवासी घेतील, असं रेल्वेला विश्वास वाटतोय. ' ज्या लोकांकडे एटीएम कार्ड आहे, त्यांना या सेवेचा लाभ घेता येईल. रांगेत उभं राहण्याची गरज राहणार नाही ', असं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी श्रीनिवास मुडगेरीकर यांनी सांगितलं. आत्तापर्यंत ऑनलाईन बुकिंग आणि मोबाईलवरून तिकीट बुकिंग करण्याची सोय होती आणि आता त्यात एटीएम सेंटर्सची भर पडलीय. त्यामुळे प्रवाशांना एनी टाईम मनी बरोबर 24 तास तिकीट बुकिंगही करता येणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा