12 डिसेंबर, दिल्ली मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारे पाकिस्तानी नागरिक असल्याच्या भारताच्या दाव्याला बळकटी मिळालीय. सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला मोहम्मद अजमल कसाब पाकिस्तानचा असल्याचं स्पष्ट झालंय. त्याचे वडील आमीर कसाब असं त्याच्या वडिलांचं नाव आहे. आमीर यांनी अजमल कसाब हा त्यांचा मुलगा असल्याचं ' डॉन ' या पाकिस्तानी वर्तमानपत्राला सांगितलंय. पाकिस्तानमधल्या फरीदकोट गावात ते राहतात. त्यांचं छोटसं दुकान आहे. महत्त्वाचं म्हणजे अजमलनंही पोलिसांना हीच माहिती दिलीय. आमीर यांनी दिलेल्या माहितीनुसार चार वर्षांआधी ईदच्या दिवशी नवीन कपडे घेण्यावरुन वाद झाला आणि अजमलनं घर सोडलं. त्यानंतर तो पुन्हा कधीही घरी आला नाही, असं त्याच्या वडिलांनी सांगितलं. मुलगा दहशतवादी झाल्याचं ऐकल्यावर धक्का बसल्याचं आमीर कसाब म्हणाले. आपण कसाबला दीड लाख रुपयांना विकल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं त्यांनी सांगितलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा