माढ्यात राष्ट्रवादीची 'पॉवरफुल' खेळी, भाजपला धक्का

माढ्यात राष्ट्रवादीची 'पॉवरफुल' खेळी, भाजपला धक्का

माढा जिंकण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीकडून सतत नवे डाव टाकले जात आहेत.

  • Share this:

माढा, 13 एप्रिल : माढा हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेचा केला आहे. अशातच आता माळशिरस तालुक्यातील भाजपचे जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला धक्का दिला आहे.

माढा जिंकण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीकडून सतत नवे डाव टाकले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच एका काँग्रेस आमदाराने भाजपला पाठिंबा दिला होता. त्याला जोरदार उत्तर देत आता राष्ट्रवादीने सुभाष पाटील यांना आपल्याकडे खेचलं आहे.

रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपमध्ये घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी खेळी खेळत संजय शिंदे यांना आपल्याकडे खेचले आणि उमेदवारी दिली.

त्यामुळे भाजपसमोर उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला. अखेर भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे इथं आता जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.

कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश?

करमाळा

माढा

सांगोले

माळशिरस

फलटण

माण

माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदासंघांपैकी 3 राष्ट्रवादीकडे आणि काँग्रेस, शेकाप आणि शिवसेनेकडे प्रत्येक 1 मतदारसंघ आहे. त्यामुळे माढ्याची ही जागा राष्ट्रवादीसाठी तुलनेनं सोपी मानली जाते. 2009 साली पवारांनी याच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली होती.

मागच्या दोन निवडणुकांत काय होती स्थिती?

2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल सव्वा तीन लाखांच्या फरकाने विजय मिळवला होता. तेव्हाही भाजपकडून त्यांच्याविरोधात सुभाष देशमुख हे मैदानात होते.

कुणाला किती मते मिळाली?

शरद पवार - 530,596

सुभाष देशमुख - 216,137

महादेव जानकर - 98,946

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी थेट निवडणुकीच्या मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील हे निवडणूक लढवत होते. मोदी लाटेचं मोठं आव्हान असतानाही या निवडणुकीत मोहिते पाटलांनी 'विजय' खेचून आणला होता. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी दिलेली कडवी झुंजही दुर्लक्षित करण्यासारखी नव्हती.

कुणाला किती मते मिळाली?

विजयसिंह मोहिते पाटील - 489,989

सदाभाऊ खोत - 464,645

प्रतापसिंह मोहिते पाटील - 25,187

मतदार संख्या आणि स्वरूप

या लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत मतदारांची एकूण संख्या 17 लाख 27 हजार 322 एवढी होती. यातील 10 लाख 80 हजार 167 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

पुरूष मतदारांचं प्रमाण : 52.84 टक्के

स्त्री मतदारांचं प्रमाण : 47.16 टक्के

मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न

पाणी आणि रस्ते हा या मतदारसंघातील कळीचा मुद्दा आहे. या लोकसभा मतदारसंघातील बहुतांश भागाला कायमच दुष्काळाला तोंड द्यावं लागतं. यंदाही हा भाग भीषण दुष्काळाने होरपळत आहे. जनावरे आणि शेतीसाठीच्या पाण्याशिवायच अनेक भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यांची स्थितीही बिकट असल्याचं चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत याच प्रश्नांवर रान पेटण्याची शक्यता आहे.

SPECIAL REPORT: कुणामुळे टळला राधाकृष्ण विखेंचा भाजप प्रवेश?

First Published: Apr 13, 2019 12:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading