जयपूर, 25 मार्च : राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्या सामन्यात गेलची आतषबाजी पाहायला मिळाली. गेलनं चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत राजस्थानच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. पण गेल बाद झाल्यानंतर, पंजाबसाठी बॅटींगची धुरा सांभाळली ती सर्फराझ खान या मुंबईकर खेळाडूने. याआधी बंगळुरू संघात असलेल्या सर्फराझला यंदाच्या लिलावात पंजाब संघानं विकत घेतले. विराट कोहलीनं दाखवलेल्या अविश्वासाला प्रतिउत्तर देत आजच्या सामन्यात सर्फराझनं 46 धावांची खेळी केली. तर, 20व्या ओव्हरमध्ये चौकार आणि षटकार मारत सर्फराजनं 180चा आकडा पार करण्यास मदत केली.
2015साली झालेल्या आयपीएलच्या लिलावात बंगळुरू संघाने त्याला विकत घेतले. मात्र बंगळुरूकडून सर्फराझनं केवळ 25 सामने खेळले. यात 45हा त्याचा सर्वाधिक स्कोर राहिला. त्यानंतर बंगळुरू संघाने सर्फराजला रिटेन केले नाही. बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली यानं दाखवलेला अविश्वास मनात घेऊन सर्फराझनं नाराजीही व्यक्त केली होती.
प्रथम श्रेणीतील मुंबईकडून खेळणाऱ्या या 21 वर्षीय फलंदाजाने याआधी प्रथम श्रेणीतील स्पर्धा चांगल्याच गाजवल्या आहेत. त्यानंतर त्याने उत्तर प्रदेश संघाकडून खेळण्यास सुरूवात केली. सर्फराझच्या प्रथम श्रेणीतील खेळीच्या जोरावर 13 एप्रिलला पंजाब विरुद्ध बंगळुरू असा सामना पंजाबच्या होमग्राऊंडवर रंगणार आहे. या सामन्यात सर्फराज विराटच्या या अविश्वासाला उत्तर देण्यासाठी उत्सुक असेल.