जालन्याच्या महाभारतात 'अर्जुन'होणार विजयी ? काय आहे वाद ?

जालन्याच्या महाभारतात 'अर्जुन'होणार विजयी ? काय आहे वाद ?

शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातल्या वादावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्याचबरोबर भाजप आणि शिवसेनेत जालन्यामध्ये मैत्री होते की वेगळेच तंटे उद्भवतात यावरून राज्याच्या राजकारणाची समीकरणंही ठरणार आहेत.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम

शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातल्या वादावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्याचबरोबर भाजप आणि शिवसेनेत जालन्यामध्ये मैत्री होते की वेगळेच तंटे उद्भवतात यावरून राज्याच्या राजकारणाची समीकरणंही ठरणार आहेत.

अर्जुन खोतकर यांनी थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनाच आव्हान दिल्यामुळे ही जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. जालन्याची जागा आपणच लढवावी यासाठी अर्जुन खोतकर हट्टाला पेटले आहेत. ही जागा शिवसेनेकडे राहिली तर ती आपणच जिंकू शकतो, असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी उद्धव ठाकरेंकडे या जागेची जोरदार मागणी केली.

धक्कादायक! सुशोभीकरणामुळे घडली CSMT पूल दुर्घटना?

अर्जुन खोतकर यांनी जालन्यामध्ये केलेल्या सर्व्हेनुसार, यावेळी त्यांना अनुकूल वातावरण आहे. त्यामुळेच ही जागा लढवायाचीच, अशी त्यांची मागणी आहे. काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार आणि अशोक चव्हाण यांचाही त्यांना पाठिंबा आहे, असं बोललं जातं.

दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची याच जागेवरून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी इथून विजय मिळवला आणि ते नरेंद्र मोदी सरकारमध्ये राज्यमंत्रीही झाले. केंद्रातलं मंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्षपद यामुळे दानवे यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे.

दानवेंनी केली अडवणूक

रावसाहेब दानवे यांनी जालनामधल्या शिवसैनिकांना त्रास दिला, त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्येअडकवलं त्यामुळेच रावसाहेब दानवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करायला आपण तयार नाही, असं अर्जुन खोतकर यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. खोतकर यांच्या मतदारसंघातल्या विकासकामांमध्ये दानवेंनी अडथळे आणले, या प्रकल्पांचा निधीही अडवून धरला, अशी त्यांची तक्रार आहे.

अर्जुन खोतकर यांचं जालन्यामधलं वर्चस्व वाढू नये म्हणून रावसाहेब दानवेंनी आपली खासदारकी, मंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्षपदाचा वापर केला. खोतकरांचे कार्यकर्ते त्यांनी फोडले, अशीही चर्चा आहे.

जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोहउद्योग आहे. या क्षेत्रातल्या उद्योगपतींचा पाठिंबा खोतकरांना मिळू नये म्हणून दानवेंनी हरतऱ्हेने प्रयत्न केले. एकंदरितच खोतकर यांचं राजकारणातून उच्चाटन करण्याचा दानवेंनी चंग बांधला होता, असा आरोप होतोय.

खोतकरांची रणनीती काय ?

चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या खोतकरांसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे आणि म्हणूनच ते हार मानायला तयार नाहीत. भाजप शिवसेना युतीमुळे जालन्याची जागा रावसाहेब दानेवंच्या पदरात पडली तर खोतकर स्वतंत्र लढण्याचीही शक्यता आहे.

शिवसेनेशी मैत्रीपूर्ण बंड करून काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडून यायचं, अशी खोतकरांची रणनीती दिसते.

प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजप रावसाहेब दानवेंच्या पाठिशी असला तरी भाजपमध्येच त्यांना अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागतो आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे या दानवेंच्या विरोधी गटाच्या मानल्या जातात. त्यामुळेच मातोश्रीवरच्या बैठकीत त्या हजर असूनही त्यांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं, असं बोललं जातंय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी जालन्यामध्ये जातीनं लक्ष घातलंय. शिवसेना आणि भाजपच्या मेळाव्यामध्ये आता या जागेबद्दल काय निर्णय होतो यावरून राज्यातही युतीमधल्या संबंधांची समीकरणं रंगणार आहेत.

===========================================================================================

First published: March 16, 2019, 4:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading