बीड, 15 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे देशावर आणि महाराष्ट्रावर मोठं संकट ओढावलं आहे. एकीकडे या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखणं आणि दुसरीकडे ठप्प झालेल्या उद्योगधंद्यामुळे कोलमडत असलेली अर्थव्यवस्था सावरण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. मात्र अशा स्थितीत समाजातील काही संवेदनशील घटक पुढे येत आपल्याला शक्य होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. बीडमधूनही याचंच उदाहरण समोर आलं आहे.
परळी येथील प्रशांत जोशी यांनी आपल्या आईच्या निधनानंतर उत्तरकार्याचा खर्च टाळत ती रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीस दिली आहे. प्रशांत जोशी हे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची स्वीय साहाय्यक आहेत. 2 एप्रिल रोजी प्रशांत जोशी यांच्या आईचं निधन झालं. त्यानंतर गोडजेवण गंगापूजनाचा कार्यक्रम न घेता प्रशांत जोशी यांनी आईच्या उत्तरकार्याचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत केली.
कोरोनाशी लढताना सर्वच जण मुख्यमंत्री सहायता निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी मदत करत आहेत. आईच्या निधनानंतर प्रशांत जोशी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्तरकार्याचा खर्च टाळून त्याची रक्कम 25 हजार रुपये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली आहे. प्रशांत जोशी यांच्या मातोश्रींचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले होते. ते अनेक वर्षांपासून धनंजय मुंडे स्वीय सहायक म्हणून काम पाहत आहेत,
कोरोनाच्या लढ्यात समाजातील प्रत्येक घटक शेतकरी शेतमजूर, सफाई कामगार,आपापल्या परीने वेगवेगळ्या स्वरूपात आपले योगदान देत आहे. याच पार्श्वभूमीवर आईच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, प्रशांत जोशींनी आपल्या आईच्या उत्तरकार्याचा विधी घरच्या घरी करत तो खर्च टाळून तो निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देऊन एक नवा पायंडा पाडला असून सोशल मीडियावर त्यांचे कौतुक केले जात आहे.
संपादन - अक्षय शितोळे