S M L

सत्तेच्या नावानं चांगभलं,अभद्र युती आणि आघाडी !

Sachin Salve | Updated On: Mar 21, 2017 09:41 PM IST

सत्तेच्या नावानं चांगभलं,अभद्र युती आणि आघाडी !

21 मार्च : आज राज्यभरात पार पडलेल्या झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी सत्तेसाठी कायपण अशीच परिस्थिती बघायला मिळाली. स्थानिक नेतृत्वांनी आपल्या राजकीय स्पर्धकांना मात देण्याच्या नादात अनेक ठिकाणी अभद्र युती आणि आघाडी केल्याचं बघायला मिळालं. तर काही ठिकाणी आपल्या पक्षातल्या बंडखोरांमुळे हातातोंडाशी आलेली सत्ता राजकीय पक्षांना गमवावी लागली.

राज्यातल्या 25 झेडपींच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांच्या निवडणुकीत अनेक मोठी चित्रविचित्र राजकीय समीकरणं बघायला मिळाली. नैसर्गिक आघाडी आणि युतीचे सर्व राजकीय अभिनिवेश पायदडी तुडवत या अभ्रद्र आघाड्या युत्या नव्याने आकाराला आल्या. कोल्हापुरात तर भाजपने सत्तास्थापनेसाठी चक्क सेना आमदारांमध्येच फूट पाडली. महादेव महाडिकांच्या मदतीने चंद्रकांत पाटलांनी मोठ्या चलाखीने सत्तेचं गणित जुळवून आणलं.आणि झेडपीवर पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष बसवला. त्याचे उट्टे म्हणून मग इकडे औरंगाबाद आणि नाशिकमध्ये शिवसेनेनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी चक्क काँग्रेसशी घरोबा केला.

नाशिकमध्ये तर शिवसेनेनं चक्क माकपचीही मदत घेतली.भाजपला तिथं अवघ्या एका मताने सत्ता गमवावी लागली. त्याचा वचपा भाजपने यवतमाळमध्ये काढला. यवतमाळमध्ये शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने दोन्ही काँग्रेसशी युती केली.

बीड आणि सोलापूरमध्ये मात्र सत्ताधारी राष्ट्रवादीवर मोठा बाका प्रसंग ओढवला. पक्षाच्याच आमदारांनी बंडखोरी केल्याने या दोन्ही ठिकाणची सत्ता राष्ट्रवादीला गमवावी लागली. बीडमध्ये सुरेश धस गटाने चक्क भाजपला मतदान केल्याने तिथं भाजपची सत्ता आली सोलापुरात तर नंबर एकचं संख्याबळ असूनही राष्ट्रवादीवर निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेण्याची नामुष्की ओढवली. तिथं माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू  संजयमामा शिंदे सर्व मोहितेपाटील विरोधकांना एकत्र आणून झेडपीची सत्ता खेचून आणली. उस्मानाबादमध्ये दरवेळी काँग्रेस - शिवसेना एकत्र येऊन राष्ट्रवादीला सत्तेबाहर ठेवायची यावेळी मात्र, राष्ट्रवादीनेच चक्क भाजपची मदत घेऊन शिवसेना-काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचलं आणि झेडपीचा बालेकिल्ला जिंकला.

तिकडे अहमदनगरमध्येही निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकलेले विखे-थोरात सत्तेसाठी पुन्हा एकत्र आल्याचं बघायला मिळालं.

Loading...
Loading...

अहमदनगरच्या झेडपी अध्यक्षपदी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेरपाटील यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील भरघोस मतांनी विजयी झाल्या. इथं प्रथमच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असं गंमतीशीर सत्ता समीकरण उदयाला आलं. पुणे आणि साताऱ्यात राष्ट्रवादीकडे पूर्ण बहुमत असल्याने त्यांचेच अध्यक्ष बनले. तर सांगली आणि लातूरमध्ये पहिल्यांदाच भाजपचा झेडपी अध्यक्ष बनला तोही स्वबळावर....एकूणच कायतर या झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्तेसाठी कायपण असचं काहिसं राजकीय चित्रं राज्यभरात बघायला मिळालं.

जिल्हा परिषदांवर कोणत्या पक्षाचा झेंडा

भाजप - 10

राष्ट्रवादी - 6

काँग्रेस - 5

शिवसेना - 4

विभागनिहाय निकाल

   कोकण -

शिवसेना - 1

काँग्रेस - 1 राष्ट्रवादी - 1

पश्चिम महाराष्ट्र - भाजप - 3

राष्ट्रवादी - 2

उत्तर महाराष्ट्र -

 शिवसेना - 1

भाजप - 1 काँग्रेस - 1

मराठवाडा -

राष्ट्रवादी - 3

शिवसेना - 2

भाजप - 2

काँग्रेस - 1

विदर्भ -

 भाजप - 4

 काँग्रेस - 2

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2017 09:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close