कर्जमाफी नाहीच !, घोषणांचा मात्र पाऊस

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 18, 2017 09:40 PM IST

कर्जमाफी नाहीच !, घोषणांचा मात्र पाऊस

mungantiwar_live18 मार्च : कर्जमाफीसाठी विरोधकांचा गोंधळ, घोषणाबाजी आणि दुसरीकडे जोरदार शेरोशायरी करत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचं चालू वर्ष 2016-17 चा अर्थसंकल्प सादर केला.  मुनगंटीवार यांनी जवळपास पाऊणे दोन तास अर्थसंकल्प वाचला पण त्यात कर्जमाफीची घोषणा केलीच नाही. परंतु, शेतकऱ्यांसाठी सरकारनं अनेक घोषणा करून मलमपट्टी केली. दुष्काळाने ग्रासलेल्या मराठवाड्यासाठी विशेष तरतूद करत विदर्भापासून ते कोकणापर्यंत शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा मात्र केल्यात. काही नव्या प्रकल्पांचाही त्यांनी श्रीगणेशा केला.

नोटाबंदी, महापालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आणि राज्यावर असलेला कर्जाचं डोंगर सांभाळत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'सबका सन्मान, सबका समाधान' असा नारा देत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर कऱण्यासाठी उभे राहिले असता विरोधकांनी कर्जमाफीची जोरदार घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडलं. पण मुनगंटीवार यांनी या गोंधळातच अर्थसंकल्पाचं वाचन सुरूच ठेवलं.

राज्यावर कर्जाचा डोंगर आहे पण राज्य प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही देत येणाऱ्या काळात विकास हेच आमचे ध्येय असल्याचं स्पष्ट केलं. कृषी क्षेत्रासाठी भरघोस तरतुदी या अर्थसंकल्पात आहेत. सिंचनासाठी 2 हजार कोटी तर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेसाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी 200 कोटींची तरतूद केलीये.  गेल्या आर्थिक वर्षात जलसंपदा खात्याचा 100 टक्के निधी खर्च झाला, अशी घोषणा मुनगंटीवारांनी केली.

मुंबई आणि नागपूर मेट्रोसाठी सातशे कोटी तर स्मार्ट सिटी योजनेसाठी सोळाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. तर उसावरचा खरेदी कर माफ करण्यात आलाय.  नागपूरच्या महत्वाकांक्षी मिहान प्रकल्पासाठी 100 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसंच नागपूरचं विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्यासाठीही निधी राखून ठेवण्यात आलाय. राज्यात रस्ते सुधारण्यासाठी 7 हजार कोटींची तरतूद केलीये. पुढील दोन वर्षात 10 हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करण्याचा मानस मुनगंटीवार यांनी बोलून दाखवला.

सर्वसामान्यांसाठी विशेष अशा घोषणा टाळण्यात आल्यात.  आमसूल आणि कार्ड स्वाईप करायचं मशीन स्वस्त करण्यात आलंय. तर मद्य आणि साप्ताहिक लाॅटरीवर टक्का वाढवण्यात आलाय.

Loading...

अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

 शेतकऱ्यांना तातडीने कर्ज मिळावं, यासाठी तरतूद

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात खेकडा उपज केंद्र उभारणार

9 कोटींची तरतूद तर बांबू उद्योगासाठी 15 कोटींचा निधी

उसावरचा खरेदी कर माफ

 आमसूल आणि कार्ड स्वाईप करायचं मशीन स्वस्त

जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर मुंबईतला जकात बंद होणार

 दारू आणि लॉटरी महागली

 मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी 700 कोटींची तरतूद

 स्मार्ट सिटी योजनेसाठी 1600 कोटी रुपयांची तरतूद

 

 नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी 100 कोटींची तरतूद

राज्यात रस्ते सुधारण्यासाठी 7 हजार कोटींची तरतूद

दोन वर्षात 10 हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करणार

रस्ते अपघात रोखण्यासाठी 34 कोटी 86 लाखांचा निधी

स्वतंत्र ओबीसी मंत्रालयासाठी 2 हजार 384 कोटी

कोकण पर्यटन विकासासाठी स्वतंत्र महामंडळ

 कृषी शिक्षणाला चालना देण्यासाठी यवतमाळ, नाशिक, सांगली जिल्ह्यातील पेठमध्ये कृषी महाविद्यालये, औरंगाबादेत राष्ट्रीय विधी विद्यापीठ बांधणार

 5 उद्योग समूहांबरोबर सामंजस्य करार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करणार

ग्रामीण भागातील गवंडी कारागिरांना प्रशिक्षण,10 हजार गवंडी कामगारांना रोजगाराची संधी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 18, 2017 09:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...