आमदार प्रशांत परिचारक अखेर दीड वर्षांसाठी निलंबित

आमदार प्रशांत परिचारक अखेर दीड वर्षांसाठी निलंबित

  • Share this:

PRASHANT PARICHARAK

09 मार्च :  भारतीय लष्करातील जवानांच्या पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांना दीड वर्षासाठी निलंबित करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भोसे इथल्या प्रचारसभेत त्यांची जीभ घसरली होती. या सभेत परिचारक यांनी राजकारण काय असते हे सांगताना सीमेवरील जवानाचा दाखला दिला होता. ‘सीमेवरील जवान वर्ष भर घरी येत नाही. तरीदेखील घरी आल्यावर त्याला मुलगा झाल्याचे समजते आणि तो गावात मुलगा झाल्याच्या आनंदात पेढेही वाटतो’ असं संतापजनक विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला. त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या निलंबनाची मागणी लावून धरण्यात येत होती.

या सर्व घडामोडीनंतर परिचारकांनी आपल्या वकिलांमार्फत ‘त्या’ वक्तव्याबद्दल महिला आयोगासमोर माफीनामा सादर केला होता. मात्र, विरोधक त्यांच्या निलंबनावर ठाम होते. विरोधकांनी सभागृहाचे कामकाज चालू न देण्याचा पवित्रा घेतला होता.

त्यानंतर कालच परिचारकांच्या वक्तव्याच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालानंतर परिचारकांना निलंबित करण्यात आलं आहे. तसंच त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याच्या चौकशीसाठी 9 सदस्यीय समितीमार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 9, 2017, 1:13 PM IST

ताज्या बातम्या