07 मार्च : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने गाजवला. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या गेटबाहेर 'कांदा आणि तूरडाळ फेको' आंदोलन करत विधानभवन परिसर दणाणून सोडला. स्वत: स्वाभिमानीचे नेते आणि खासदार राजू शेट्टी या आंदोलनात सहभागी झाले होते. जोरदार घोषणाबाजी देत निदर्शने करणाऱ्या या आंदोलकांना आवर घालताना पोलिसांनाही नाकीनऊ आले. त्यानंतर शेट्टी यांच्यासह या शेकडो कार्यकर्त्यांची पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
विधानभवनाच्या मेन गेटबाहेर घोषणाबाजी करत राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह 'कांदा फेको' आणि 'तूरडाळ फेको' आंदोलन केलं. आंदोलकांनी तूरडाळ आणि कांदा रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला. कांद्याला हमीभाव द्यावा, अशी आंदोलकांची मुख्य मागणी होती. दरम्यान या आंदोलनासाठी सदाभाऊ खोत अनुपस्थित असल्याने शेतकरी संघटनेतील तसंच खोत -शेट्टी यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सोमवारी सुरूवात झाली असून शेतमालाच्या भावावरुनही विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्याच पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी कांद्यासाठी कार्यकर्त्यांसह विधान भवनाजवळ आंदोलन केलं.
दरम्यान, या आंदोलनावर बोलताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सारवासारव केली. 'हे आंदोलन माझ्याविरोधात नाही. राजू शेट्टींनी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलनं केली आहेत. तसंच हे आंदोलन आहे. आमच्यात संवाद आहे. कम्युनिकेशन गॅप नाही,' अशी सारवासारव खोत यांनी केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा