05 मार्च : भाजप आणि शिवसेनेने मार्चमध्येच जनतेला एप्रिल फूल केलं असून शिवसेनेसाठी मुंबई महापालिका म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. त्याचबरोबर, यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पारदर्शक सरकारचा अपारदर्शक कारभार समोर आणू असं इशाराही त्यांनी दिला आहे.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. यापार्श्वभूमीवर आज (रविवारी) दुपारी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर टीकास्त्र सोडले.
भाजप आणि शिवसेनेने जनतेला मूर्ख बनवण्याचं काम केलं असं सांगत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शिवसेनेच्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी राजीनामे देण्याचं नाटक केलं. पण प्रत्यक्षात शिवसेनेला फक्त मुंबई महापालिकेत रस आहे. त्यांच्यासाठी मुंबई महापालिका म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली. शिवसेनेने आधी कर्जमाफीच्या गप्पा मारल्या, मग शेतकऱ्यांनाच गुंडाळून ठेवलं. आता भविष्यात त्यांना याची किंमत चुकवावी लागणारच असं ते म्हणालेत. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्यास अजून मुहूर्त मिळाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन ते जनतेची फसवणूक करत आहे. शिवाजी महाराज आता असते तर त्यांनी या दोघांचाही कडेलोट केला असता असे त्यांनी सांगितलं.
तर निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेमध्ये रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरुन धनंजय मुंडेंनी #DoYouRemember म्हणत सेना-भाजपला त्यांच्या खास शैलीत टोला हाणला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा