मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, चक्क आडनावाचं भाषांतर

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, चक्क आडनावाचं भाषांतर

  • Share this:

NIKITA KITE

27 फेब्रुवारी : मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराची अनेक उदाहरणं आपण याआधीही पाहिली आहेत. मात्र, यावेळी मुंबई विद्यापीठाने या सगळ्यावर कळसच गाठला आहे. बीएमएमच्या एका विद्यार्थिनीच्या पदवी प्रमाणपत्रात तिच्या ‘किटे’ या आडनावाचे चक्क भाषांतर करून ‘पतंग’ असं छापण्यात आल्याचा अजब प्रकार उघड झाला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह पालकही अवाक झाले असून परीक्षा विभागावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे.

मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. त्यानंतर अनेक कॉलेजांमध्ये दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात येत आहेत. रुइया कॉलेजमध्ये बीएमएमचं शिक्षण पूर्ण केलेल्या निकिता किटे या विद्यार्थिनीने शुक्रवारी आपलं पदवी प्रमाणपत्र पाहिलं आणि तिला धक्काच बसला. तिच्या प्रमाणपत्रावर चक्क KITE NIKITA BABURAO SUREKHA हे नावाचं मराठीत भाषांतर करुन पतंग निकिता बाबुराव सुरेखा असं छापण्यात आलं आहे.

'किटे' या अडनावाचं इंग्रजी स्पेलिंग 'Kite' असं होतं. मात्र मराठीत नाव लिहिताना विद्यापीठाने चक्क गुगल ट्रान्सलेटरचा वापर करून तिच्या आडनावाचं भाषांतर करून 'पतंग' असं छापलं. पदवी प्रमाणपत्रावरील आपलं नाव पाहून निकिताने ट्विटरवरून नाराजीही व्यक्त केली आहे. ‘पदवी प्रमाणपत्र हे आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे. अशा वेळी जर या प्रमाणपत्रावर अशी चूक होणार असेल, तर काय बोलणार? विद्यापीठाने अशा प्रकारची चूक करू नये,’ असं निकिताने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

विशेष म्हणजे निकिताचीच मैत्रीण असलेल्या दिपालीच्या आडनाबाबतही अशीच चूक करण्यात आलीय. THAKURDESAI DEEPALI VASUDEV SWATI या नावाचं मराठीत भाषांतर करुन ठाकुरभाई दिपाली वासुदेव स्वाती असं केलय. THAKURDESAI चं ठाकुरभाई कसं होऊ शकतं, असा प्रश्न दिपालीला पडलाय.

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 27, 2017, 12:59 PM IST

ताज्या बातम्या