मुंबईत झालेल्या जास्तीच्या मतदानाचा फायदा कुणाला ?

मुंबईत झालेल्या जास्तीच्या मतदानाचा फायदा कुणाला ?

  • Share this:

polling-personnel-at-an-evm-electronic-voting-machine-distribution-centre-on-the-eve-of-third-phase

22 फेब्रुवारी : मुंबई महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला 55 टक्के मतदान झालं. 2012 च्या तुलनेत यावेळी 6 लाखांनी जास्त मतदान झालं. या जास्त मतदानाचा फायदा शिवसेनेला होणार की भाजपला यावर जोरदार चर्चा सुरू आहे. आधी झालेल्या विधानसभा आणि लोकसभेचं मतदान पाहिलं तर वाढलेल्या मतदानाचा कल हा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असतो पण मुंबई महापालिका निवडणुकीच्या बाबतीत हा निकष लागू होत नाही, असं दिसतंय.

मुंबईमध्ये जिथेजिथे जास्तीचं मतदान झालं ते भाग शिवसेनेची ताकद असलेले भाग आहेत. मुंबईमधले सुमारे 100 वॉर्ड शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जातात आणि इथेच जास्तीचं मतदान झालंय. शिवाजी पार्क आणि प्रभादेवी या भागात 63 टक्के मतदान झालं तर कामगार क्रीडा केंद्र आणि दादरच्या पश्चिम भागात 60 टक्के मतदानाची नोंद झाली. मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरात मतदानाची टक्केवारी वाढलीय.

मुंबईमधले हे सगळे मराठी मतदारांचं प्राबल्य असलेले वॉर्ड आहेत. गेल्या वेळी या भागात बाजी मारणारी मनसे यावेळी मात्र इथे आपली ताकद गमावून बसलीय. याचा फायदा शिवसेनेला होणार की भाजपला हा कळीचा मुद्दा आहे. नव्याने मतदान करायला बाहेर पडलेला मतदार आणि तरुण मतदार यांचा कल कुणाकडे जातो हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मुंबई महापालिकेमध्ये एकूण 227 जागा आहेत. शिवसेना किंवा भाजपला बहुमतालाठी 114 जागांची आवश्यकता आहे. जास्तीच्या मतदानाचा फायदा मिळवत ही मॅजिक फिगर कोण गाठणार हे उद्याच्या निकालानंतरच कळेल. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे जिंकणार की हरणार यावरच राज्य सरकारचंही भवितव्य अवलंबून आहे.

अॅक्सिस - इंडिया टुडे च्या सर्व्हेनुसार, मुंबईमध्ये शिवसेना नंबर वन राहील, असा अंदाज आहे. भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहील, असंही हा सर्व्हे सांगतो. हे अंदाज जर खरे ठरले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपसाठीच हा धोक्याची घंटा असेल. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार नोटीस पिरेडवर आहे, असा इशारा शिवसेनेने आधीच दिलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप - शिवसेनेच्या या सामन्यामध्ये नेमका विजय कुणाचा होतो हे आता उद्याच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

 

First published: February 22, 2017, 9:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading