19 फेब्रुवारी : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या प्रचारांच्या तोफा थंडवण्याच्या काही तास अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ठाण्यातील सभेत शिवसेनेवर घणाघाती हल्ला चढवला. आनंद दिघे यांची शिवसेना आता स्वार्थी लोकांची झाली आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी आणि प्रताप सरनाईक यांच्या नावाचा उल्लेख केला. या दोघांनी आपल्याच नातेवाईकांना तिकिटं वाटली आहेत असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी घराणेशाहीकडे बोट दाखवलं.
ठाण्यातील पाचपाखाडीत आपल्या शेवटच्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्द्यांना हात घालत शिवसेनेला लक्ष्य केलं. मुख्यमंत्री आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, काही लोकांसाठी महापालिका ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. आम्ही कुणालाही ब्लॅकमेल करून गब्बर झालेलो नाही. आमच्यासाठी महापालिका म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी नाही. महापालिकेचा कारभार कसा चालवावा यापेक्षा तो कुणासाठी चालवावा याला महत्त्व असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. कल्याणकारी राज्याचा अर्थ स्वत:चे कल्याण नव्हे, तर समाजाचे कल्याण करणारे राज्य असल्याचे म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला हाणला.
त्याचबरोबर, इतकी वर्षं सिंहाचा बछडा बकऱ्यांच्या कळपात होता. आता त्याला स्वतःची ताकद कळल्याचा टोलाही फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला. या पुढं जाऊन रावणाची लंका जाळायला निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांना त्यांची ताकद कळली आहे. आता हनुमानासोबत बिभिषणांचाही सन्मान होईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv