अजित पवारांनी उडवली सेना-भाजपची खिल्ली

अजित पवारांनी उडवली सेना-भाजपची खिल्ली

  • Share this:

ajit 1

12 फेब्रुवारी : निवडणुकीमुळे अजित पवारांच्या हल्ली रोज सभा असतात आणि ते अतिशय रंगात येऊन भारी कल्ला करतात.  नगर जिल्ह्यामधल्या त्यांच्या २ सभांमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री फडणवीस आणि मोदींवर टीका करताना भरपूर कोट्या केल्या. मोदी म्हणतात मी फकीर आहे, अहो पण बाकीचे संसारी आहेत, त्यांना नोटाबंदीचा फटका बसतोय, असं अजित दादा म्हणाले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्यावर तुम्ही 2014 साली कुठे होतात, असा चिमटा त्यांनी काढला. अहमदनगर जिल्ह्यात पारनेर, श्रीगोंद्यात प्रचार सभेत ते बोलत होते.

यावेळी अजित पवार यांनी नोटबंदीवर कडाडून टीका केली. पंतप्रधानांनी कोणालाच विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप त्यांनी केलाय.भाजप सहकार मोडीत काढत असून आरबीआयनं जिल्हा बँकांना पुरेसा पैसा दिला नसल्याचा आरोप पवार यांनी केलाय. नोटबंदीनं अर्थव्यवस्था विस्कळीत झाली असून मोदी श्रीमंताला श्रीमंत करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

यावेळी अजित पवार यांनी शेतीमालाच्या समस्यांकडेही लक्ष वेधलं. पंतप्रधानांनी उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याचं अश्वासन दिलं पण कांद्यासह सर्वच शेतीमालाचं वाटोळे झालं, मोठ्या संकटानंतर ऊसाला चार पैसे जास्त मिळण्याची अपेक्षा होती. मात्र परदेशातून कच्ची साखर आणण्याचं धोरण घेतल्यानं सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर का उठलंय, असा सवालही अजित पवार यांनी केलाय.

'शिवसेनेनं शेतकर्‍यांसाठी काहीच केलं नाही. कोणतीही सहकारी संस्था उभारून विकसित केली नाही. सेनेचे पाचही मंत्री शहरातले आहेत. सुभाष देसाई पडूनही त्यांना मंत्री केलंय.'असंही ते म्हणाले. सेनेचा कारभार 'जय भवानी जय शिवाजी आणि टाक खंडणी'पुरताच असल्याचा आरोप पवार यांनी केलाय.

सेनेचे मंत्री खिशात राजीनामा घेऊन फिरतोय बॅगा तयार असल्याचं सांगतात. मात्र त्यांच्यात सत्ता सोडण्याचं धाडस नाही. गुळाला मुंग्या चिकटल्यासारखं ते सत्तेला चिकटल्याची टीका पवार यांनी केलीय.

'फडणवीस हे गुंडांचे मुख्यमंत्री असल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात. पण त्यांची फार उशिरा सटकली. युतीत २५ वर्षे सडल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात. मात्र हे समजायला इतकी वर्षे लागली, हीच का ठाकरेंची दूरदृष्टी,' असा सवालही अजित पवारांनी केलाय. मुख्यमंत्री आणि ठाकरे एकमेकांची औकात काढतायत मात्र त्यामुळे नागरिकांच्या समस्या सुटणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.

यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकरी असल्याच्या विधानाची खिल्ली उडवली. 'मुख्यमंत्र्यांना म्हशीची धार काढायची माहीत आहे का, पिशवीतलं दूध घेणाऱ्याला कसलं दूध आणि धार माहिती? लाथ मारल्याचंही कळायचं नाही,' असं म्हणून अजित पवार यांनी मोठ्या मिष्किलपणे मुख्यमंत्र्यांची थट्टा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2017 03:09 PM IST

ताज्या बातम्या