11 फेब्रुवारी : दिव्यामध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. मात्र, सभा संपल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाजरं वाटप केली. यावेळी शिवसैनिकांनी भाजपविरोधात घोषणाबाजीही केली.
ठाण्याजवळच्या दिव्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'विजय संकल्प सभा' पार पडली. या सभेत त्यांनी दिव्याच्या विकासाचे दावे करतानाच शिवसेनेने दिव्याकडे केलेल्या दुर्लक्षाबद्दल त्यांचा खरपूस समाचार घेतला. त्यासोबतच भाजपच्या किमान 10 उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी दिव्यात खास तयारी करण्यात आली होती. रस्त्यांपासून सभास्थानापर्यंत खास स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती.
शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांच्या या सभेला टार्गेट केलं. सभा संपल्यानंतर जाणाऱ्या लोकांना शिवसैनिकांनी गाजरं वाटप केली. विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना गाजरं कशामुळे वाटताय हे कळलेच नाही. मात्र, तोपर्यंत शिवसैनिकांनी गाजर वाटपाचा कार्यक्रम आटोपून घेतला होता. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या सगळा प्रकार लक्षात आला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv