घ्या निवडणुका आम्ही परिवर्तनासाठी तयार -उद्धव ठाकरे

  • Share this:

Devendra and uddhav04 फेब्रुवारी : मुख्यमंत्री म्हणतात परिवर्तन होणार, पण तुमच्याकडे अजून अडीच वर्ष आहे. जर तुम्हाला परिवर्तन घडवायचंच असेल तर घ्या निवडणुका आम्ही तयार आहोत असं आव्हानचं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. तसंच शिवसेनेला संपवणाऱ्यांच्या पिढ्या संपल्यात. आमची औकात काढणाऱ्यांना लोकं निवडणुकीनंतर गायब झाली असा पलटवारही उद्धव ठाकरेंनी केला.

गिरगाववर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ फोडला. आणि हा प्रचार सभा नाहीतर विजयी सभा आहे असा विश्वासच उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला.

कौरव आणि पांडव फ्रेंडली मॅच कशी ?

अमित शहा म्हणता आमची फ्रेंडली मॅच आहे. मग कौरव आणि पांडवामध्ये काय फ्रेंडली महाभारत घडलं होतं का?  महाभारत असेल तर, श्रीखंडी-पाखंडी कोण ते ठरवा असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

'बोबडी वळली आणि दात घश्यात गेली'

केंद्र म्हणत मुंबई महापालिकेचा व्यवहार सर्वात पारदर्शक आहे. केंद्रात यांचेच सरकार आणि यांनीच पारदर्शक प्रमाणपत्र देऊन ज्यांची बोबडी वळलीये त्यांची दात घशात घातलीये. चांगले आरोप करा आणि स्पष्ट बोला अशी खिल्लीच उद्धव ठाकरे यांनी किरीट सोमय्या यांचं नाव न घेता उडवली.

'सेनेच्या होर्डिंगवरील कामाचे  मुद्दे खोडून दाखवा'

मुंबईत जी विकास कामे झाली ती शिवसेनेनं केली आहेत. हे आम्ही ठामपणे सांगतोय.  मेट्रो आम्ही करणार, मग आधी काय मेट्रो धावत नव्हती, काँग्रेसच्या काळात मेट्रो धावली. मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचं काम करुन आमच्यावर काय उपकार करत नाही, ते सगळं नियोजित आहे. कोस्टल रोड आम्ही करणार हे यासाठी सांगतो ते महापालिकेचं काम आहे, तुम्ही महापालिकेच्या माध्यमातून हे काम करुन दाखवणार हे सांगावं. शिवसेनेनं जे होर्डिंग लावले आहे त्या कामाचा एक मुद्दा तरी खोडून दाखवा असं जाहीर आव्हानच उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केलं.

'बाळासाहेबांची शिवसेना संपवणारे संपले'

आमची औकात काढली त्याबद्दल तुमचे आभार..कारण मागील वेळा पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली. आता जनतेनंच त्यांना संपवलंय. बाळासाहेबांची शिवसेना संपवणारे संपले. तुमच्या पिढ्या संपतील पण शिवसेना संपणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.

'घ्या निवडणुका आम्ही तयार आहोत'

मुख्यमंत्री म्हणाले परिवर्तन होणारच, असं दाखवता की आम्ही फार बुद्धीमान आहोत. मुख्यमंत्र्यांना परिवर्तनाची इतकी घाई का झालीये, अजूनही तुमच्याकडे अडीच वर्ष आहे. केंद्रातही अडीच वर्ष बाकी आहे. मग यांना परिवर्तनाची घाई काय लागली. जर परिवर्तन घडवायचे असेल तर घ्या निवडणुका आम्ही तयार आहोत असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी केलं.

'आता युती नाही'

यापुढे युती नाही, एकदा युतीच्या जोखड्यातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा युती करायची नाही. मनामध्ये काळंबेरं घेऊन युतीसाठी हात पुढं करणाऱ्यांसोबत युती करायची नाही असंही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता स्पष्ट बजावलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 4, 2017, 9:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading