01 फेब्रुवारी : ऐतिहासिक शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थानं स्पष्ट करणारा हा अर्थसंकल्प आहे, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाचं स्वागत केलंय. याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आभार मानलेत.
ऐतिहासिक शब्दाची व्याख्या खऱ्या अर्थाने स्पष्ट करणारा, नवभारताची निर्मिती करणारा, सर्वसमावेशक अर्थसंकल्प! https://t.co/dOaT9eRe2D
मुख्यमंत्री म्हणाले की, 'यामुळे विकासाचं नवं दालन खुलं झालं. भांडवली गुंतवणूक थेट 25 टक्क्यांनी वाढलीय. शेतीवरची गुंतवणूक 25 टक्क्यांनी वाढलीय. मरेगावरची गुंतवणूक 38 हजार कोटींवरून 52 हजार कोटींवर गेलीय. दलितांवरच्या योजनांमध्येही वाढ झालीय.'
मोदींनी जे स्वप्न पाहिलं होतं, सबका साथ सबका विकास ते या अर्थसंकल्पातून पूर्ण होताना दिसतंय, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकीकडे आर्थिक शिस्त पाळत असताना, एवढी मोठी आर्थिक गुंतवणूक होतेय, याचं कारण नोटबंदी, नोटबंदीमुळे हे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतायत.' असंही ते म्हणाले.
राजकीय फंडिंगसाठी एक पारदर्शी योजना आणलीय. या देशातला भ्रष्टाचार आणि काळा पैसा संपवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं जाणार आहे. असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
2.5 ते 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के टॅक्स ही कधीही न झालेली ऐतिहासिक बाब झालीय.असं म्हणून मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. लघु उद्योगाला प्राधान्य आहे. त्यामुळे रोजगार वाढतील, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
डिजिटल सेक्टरकडे जाणारा रस्ता हा अर्थसंकल्प दाखवतो. त्यातून भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे हेच दिसतंय. हा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.