31 जानेवारी : सेना आणि मनसे युती व्हावी राज ठाकरेंची इच्छा असून त्यासाठी त्यांनी उद्धवंना फोन केले पण ते फोनवर आले नाही. आज जे झालं ते झालं शेवटी आपला तो आपलाच असतो. उद्या जरी युतीची वेळ आली तरी आम्ही तयार आहोत असं स्पष्ट मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलं. तसंच मागील विधानसभेच्या वेळी शिवसेनेकडून युतीसाठी विचारणा झाली होती असाही खुलासा नांदगावकर यांनी केला.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आयबीएन लोकमतच्या न्यूज रुम चर्चा कार्यक्रमात मातोश्रीवर झालेल्या बैठकीचा तपशीलवार खुलासा केला. मातोश्रीवर आतापर्यंत माझी कधीही भेट नाकारली नाही, कारण मी ठाकरेंचा झेंडा हाती घेतलाय. युती तुटण्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना सतत फोन केले. संजय राऊतांशी पण राज ठाकरेंचं फोनवर बोलणं झालं. परवा सुद्धा राज ठाकरे यांनी उद्धवंना फोन केला पण ते फोनवर आले नाही. युतीसाठी राज यांना मातोश्रीवर जाऊन उद्धव यांची भेट घ्यायची होती असा खुलासा नांदगावकर यांनी केला.
मागील विधानसभेच्या वेळी उद्धव ठाकरे यांनीच मनसेसोबत युतीची विचारणा केली होती. त्यासाठी त्यांनी फोनही केला होता.
त्यानंतर सेनेकडून कोण बोलणार याची आम्ही वाट पाहत होतो.
एवढंच नाहीतर आम्ही एबी फाॅर्म वाटण्याची वेळ आली होती, तोपर्यंत आम्ही वाट पाहून होतो. पण सेनेकडून त्यावेळी सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही आणि युती होऊ शकली नाही असा खुलासा नांदगावकरांनी केला.
आताही मी मातोश्रीवर जाऊन प्रस्तावर दिला. ज्या आमच्या जागा आहे त्या आम्हाला मिळाव्यात एवढीच आमची अट होती. या अटीवर राज ठाकरे स्वत: मातोश्रीवर येऊन बोलणार होते असंही नांदगावकर यांनी सांगितलं. तसंच काहीही असलं तरी आपला माणूस तो आपला माणूस असतो. राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं ही महाराष्ट्राची इच्छा आहे. उद्या जरी एकत्र येण्याची वेळ आली तर मी पुन्हा प्रयत्न करेन असंही नांदगावकरांनी स्पष्ट केलं.
एकदम यश हाती आलं ते आम्हाला सांभाळता आलं नाही. मागील निवडणुकीत आमचा पराभव झाला, आम्ही खरंच कमी पडलो अशी स्पष्ट कबुली नांदगावकरांनी दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv