अमेरिकेत 7 देशांतील मुस्लिमांना बंदी; ट्रम्पच्या निर्णयावर गुगल, फेसबुक नाराज

अमेरिकेत 7 देशांतील मुस्लिमांना बंदी; ट्रम्पच्या निर्णयावर गुगल, फेसबुक नाराज

  • Share this:

28-trump-exec-order-muslims.w710.h473

29 जानेवारी :  अमेरिकेच्या नव्या व्हिसा पॉलिसीनुसार सात मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी पेंटागॉन येथे निर्वासितांसंबंधी धोरणाचा पुनर्आढावा घेणाऱ्या एका सरकारी अध्यादेशावर स्वाक्षरी केली. या अध्यादेशानुसार सीरिया, इराण, इराक, सुदान, लिबीया, येमेन आणि सोमालिया या देशांतील मुस्लिम नागरिकांना पुढील 90 दिवस अमेरिकेत कोणत्याही कामासाठी जाता येणार नाही. तर निर्वासितांना चार महिन्यांची तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

अमेरिकेतील दहशतवाद संपवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. 9/11 चा हल्ला आम्ही कधीही विसरणार नाही. त्यामुळे अमेरिकेवर प्रेम करणाऱ्या आणि देशाच्या हिताचा विचार करणाऱ्यांनाच यापुढे अमेरिकेत स्थान दिलं जाईल, असं ट्रम्प यांनी सांगितलं.

ट्रम्पच्या निर्णयावर गुगल, फेसबूक संतप्त

ट्रम्प यांच्या या निर्णयाचं अमेरिकेत जोरदार पडसाद उमटलेत. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील आयटी क्षेत्र हादरून गेलं असून गुगल, अॅपल आणि फेसबुक या टेक क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय मूळचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्रम्प यांचा हा निर्णय म्हणजे अमेरिकेत नव्यानं येऊ घातलेल्या टॅलेंटसाठी अडथळा असल्याची टीका केली आहे.  या निर्णयाचा गुगलच्या जवळपास 187 कर्मचा-यांवर परिणाम होईल असं ते म्हणाले. या निर्णयामुळे गुगलने आपल्या प्रवासी कर्मचा-यांना माघारी बोलावलं आहे.

तर फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्कनंही या निर्णयावर टीका करताना चिंता व्यक्त केली आहे. अमेरिका हा देशच परप्रांतीयांचा आहे. असंख्य अमेरिकन नागरिकांप्रमाणे मीही स्थलांतरिताचा मुलगा आहे, माझी पत्नीही स्थलांतरितच आहे, असं त्यानं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. शेकडो वर्षांपासून बाहेरच्या देशाचे लोक इथे येतात आणि अमेरिकेच्या प्रगतीत आपलं योगदान देतात. आपला याचा अभिमान हवा. माझे पणजी आणि पणजोबा जर्मनी, ऑस्ट्रिया आणि पोलंडमधून इथे आले होते. माझी पत्नी प्रिसिलाचे पालक चीन आणि व्हिएतनामहून आलेले निर्वासित होते. त्यांनाही नाकारलं असतं तर प्रिसिला माझ्याबरोबर नसती, अशी पोस्ट झकरबर्गनं फेसबुकवर टाकली आहे.

‘अॅपल’चे सीईओ टीम कूक यांनीही ट्रम्प यांच्या नव्या धोरणाला आपला पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘ट्रम्प यांची काळजी समजते, पण हा उपाय नाही. या निर्णयाचा कसा वाईट परिणाम होईल, हे आम्ही व्हाईट हाऊसला सांगत आहोत’ असं कुक यांनी अॅपल कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

इराणचं ट्रम्प यांना 'जशास तसं' उत्तर!

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचा इराणने जशास तसं उत्तर दिलं आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी अमेरिकी नागरिकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने ज्या देशांच्या नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे त्यात इराणचाही समावेश असून ट्रम्प यांचा हा निर्णय इराणचा अपमान करणारा आहे, असे इराण सरकारने म्हटले आहे. त्यामुळे जोपर्यंत अमेरिकेकडून इराणी नागरिकांवर लादलेले निर्बंध हटवले जात नाहीत तोपर्यंत इराण आपल्या भूमीवर अमेरिकी नागरिकांना प्रवेश देणार नाही, असं इरणने आपल्या निवदेनात निक्षून सांगण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 29, 2017, 8:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading