21 तारखेला शिवसेनेला त्यांची औकात दाखवू ,फडणवीसांचा घणाघात

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 28, 2017 10:03 PM IST

 21 तारखेला शिवसेनेला त्यांची औकात दाखवू ,फडणवीसांचा घणाघात

devendra_fadanvis_bjp_melava21 जानेवारी :  युती करायची नाही हे शिवसेनेनं अगोदरच ठरवलं होतं. कारण पारदर्शीपणाची अट सेनेला मान्य नव्हती. आम्हाला 60 जागा देऊन आमची औकात सेनेच्या शकुनीमामांनी काढली होती. आता 21 तारखेला आम्ही तुमची औकात दाखवू असा घणाघात करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणशिंग फुंकले. तसंच भगवा झेंडे घेऊन हप्ते वसुली करायला सत्ता हाती दिली नाही. ज्या शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करात त्या शिवरायांच्या नावाने खंडणी वसुली नको, हे मला कदापी मान्य नाही असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

मुंबईत गोरेगावला एनएसई ग्राऊंडवर भाजपचा विजय संकल्प मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काय प्रत्युत्तर देतात याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या आधी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना दुर्योधनाची उपमा दिली. एवढंच नाहीतर उद्धव ठाकरे हे अहंकारी रावण आहे अशी टीकाही केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करताना शेलारांच्या विधानाचा धागा पकडत मी काही त्यांना दुर्योधन म्हणणार नाही जर म्हटलो तर मंत्रिमंडळात मला कौरवांसोबत बसल्यासारखं वाटेल अशी कोपरखळी लगावलीय.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला मोर्चा सेनेकडे वळवला. त्यांनी युती तोडण्याची घोषणा केली. पण, युती का तोडली हे त्यांनी सांगितलंच नाही. ज्यावेळी चर्चा सुरू झाली तेव्हा शिवसेना 147 जागा आणि भाजप 128 जागा लढेल असं ठरलं होतं. पण आम्ही 151 जागा शिवाय मागे हटणार नाही असं शिवसेनेनं ठरवलं होतं. तरीही आम्ही कमी जागेवर लढण्याची तयारी दाखवली होती.  पण 151 जागांपेक्षा कमी घेण्यास सेना तयार नव्हती. भाजपला फक्त 60 जागा देण्याची तयारी सेनेनं दाखवली होती. हे आम्हाला कदापी मान्य नव्हतं. चार पाच जागा इकडे तिकडे झाल्या असत्या तरी चाललं असतं. पण, सेनेच्या मनातच युती करण्याचं नव्हतं असा आरोपच मुख्यमंत्र्यांनी केला. तसंच विधानसभेच्या वेळी माझं मी भाग्य समजतो. त्यावेळी युती तुटली म्हणून मी मुख्यमंत्री झालो  असंही मुख्यमंत्री म्हणाले.

'शिवरायांच्या नावाने खंडणीखोरी'

भगवा झेंडा हा शिवाजी महाराजांचा आहे. आणि शिवरायांचा आशिर्वाद आम्हाला लाभला आहे. इतरांसारखं भगवा झेंडे घेऊन हप्ते वसुली आम्ही करत नाही. आणि हप्ते वसुली करायला सत्ता हाती दिली नाही. शिवरायाचं नाव फक्त भाषणापुरतं वापरणारे त्यांच्या नावाने खंडणी वसुली करता हे मी कदापी सहन करणार अशी घणाघाती टीकाही फडणवीस यांनी केली.

Loading...

उद्धव ठाकरेंभोवती शकुणीमामा

युतीच्या चर्चेसाठी सेनेचे एक दोन नेते आमच्याकडे आले होते. त्यांनी युती करायची नाही असंच ठरवून आले होते. ज्याप्रमाणे दुर्योधनाला शकुनीमामांने धडे दिले. तसेच हे शकुनीमामा होते. त्या शकुणीमामांनी आम्हाला गृहीत धरून आमची औकात काढली.आता 21 तारखेला आम्ही त्यांची औकात दाखवून देऊ, भाजपची काय ताकद आहे हे 21 तारखेला कळेल अशी जळजळीत टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. तसंच तुमच्या विचारांशी आमची फारकत नाही, तर तुमच्या आचारांशी आमची फारकत आहे. पारदर्शीच्या मुद्दयावर युती करावी यासाठी मी आग्रही होतो. पण पारदर्शी पणाची अट सेनेला मान्य नव्हती असा आरोपही त्यांनी केला.

'करून दाखवलं म्हणावं लागत नाही'

गेल्या 25 वर्षांमध्ये युतीमध्ये आम्ही एवढं मात्र शिकलो की, कुणासोबत फरफटत जाऊ नका. 25 वर्षांत तुम्ही आमच्या बळावर महापालिका जिंकू शकले, महापौर बनवले. आता तुम्ही सोबत नसलात तरी हरकत नाही, पण परिवर्तन हे होणारच आहे. आम्हाला करून दाखवलं म्हणावं लागत नाही, लोकचं आम्हाला म्हणता तुम्ही करून दाखवलं अशी टोलेबाजीही मुख्यमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांचा आवाज बसला

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारच्या विकास कामाचा पाढाच वाचून दाखवला. मेट्रो प्रकल्प, आवास योजना, कोस्टल रोड विकासकाम आम्ही करणारच असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. भाषणादरम्यान, मुख्यमंत्र्यांचा आवाज बसला. त्यावेळी ग्लासातील पाणी पित असताना 'आज पाणी पितोय 21 तारखेला पाणी पाजणार' अशी टोलेबाजीही मुख्यमंत्र्यांनी केली. अखेर आवाज बसल्यामुळे मुख्यमंत्र्यांना भाषण आवरतं घ्यावं लागलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2017 08:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...