शरद पवारांचा वारसदार कोण ?, अजित पवार म्हणतात...

शरद पवारांचा वारसदार कोण ?, अजित पवार म्हणतात...

  • Share this:

ajit_pawar_on_sharad-pawar25 जानेवारी : शरद पवारांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार ? या प्रश्नावर अजित पवारांनी अत्यंत सूचक असं वक्तव्य केलं. पवार साहेबांच्या पद्धतीप्रमाणे जी व्यक्ती काम करेल मग ती पवार आडनावाची किंवा सुळे आडनावाची असेल अथवा नसेल ती व्यक्ती हक्कदार असू शकते  या मताची मी आहे असं अजित पवारांनी म्हटलंय. त्यामुळे शरद पवारांच्या नंतर कुणाच्या नावाची वर्णी लागेल या चर्चेला सुरुवात झालीये.

आयबीएन लोकमतच्या न्यूजरूम चर्चा कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार  यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर उत्तरं दिली. पुण्यामध्ये आघाडीसाठी आम्ही सकारात्मक आहोत पण आघाडी सन्मानपूर्वक झाली पाहिजे असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. नेते,कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. नोटबंदीच्या मुद्द्यावरुन त्यांनी केंद्र, राज्य सरकारवर टीका केली. एखादी लाट कायम राहत नाही असं सांगायलाही ते विसरले नाहीत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयला 50 दिवसांत 60 परिपत्रकं का काढावी लागली असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

शरद पवार यांचं काम श्रेष्ठचं आहे त्यामुळे त्यांचा पद्मविभूषणने सन्मान होणं हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे असंही अजित पवार म्हणाले.  तसंच जी व्यक्त श्रेष्ठ असते ती श्रेष्ठचं असते त्याची तुलना आमच्यासोबत होऊ शकत नाही.आम्ही आमच्या परीने काम करत राहिलो. त्यांच्या पुण्याईने आम्ही सहावेळा आमदार होऊ शकलो असंही अजितदादा म्हणाले.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर ?

शरद पवारांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की,  उद्या कधी तरी शरद पवार यांच्यानंतर कोण हा प्रश्न येणारच आहे. राष्ट्रवादीची कार्यकारणी यावर बसून निर्णय घेईल.  लोकशाहीच्या पद्धतीने निर्णय घेण्यात येईल. पवारसाहेबांच्या कामाची जी पद्धत आहे. त्या पद्धतीने जो काम करेल अशी जी व्यक्ती असेल मग तीचं आडनाव पवार असेल नसेल किंवा सुळे असेल नसेल किंवा आणखी कुणी असेल या मताची मी आहे आता हा प्रश्न इथेच संपला असं सांगत त्यांनी पवारांच्या निवृत्तीवर पुढे बोलणं टाळलं.

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांचं नाव ?

राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी बोलायचं झालं तर केंद्रामध्ये जो पक्ष बहुमतात असतो तो याचा निर्णय ठरवत असतो. निवडणुकांमध्ये शिस्त आणि आचारसंहिता आणण्याचं काम टी.एन. सेशन यांनी केलं होतं. पण त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी फॅार्म भरला. पण ते निवडून आले नाही. शरद पवारांनीच आमचे खासदार कमी आहे असंही स्पष्ट केलं. त्यामुळे आम्हाला राष्ट्रपतीपद मिळूच शकत नाही हे स्पष्ट झालं. आता कमी खासदार असताना चंद्रशेखर यांना राष्ट्रपतीपद मिळालं होतं. आतापर्यंतचे राष्ट्रपती झाले आणि त्यांच्या कामाची पद्धत आणि पवारांची कामाची पद्धत ही वेगळी राहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा शरद पवार जर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जाहीर झाले तर शिवसेनेचा पाठिंबा राहिल असं जाहीर केलं होतं. परंतु, ते त्यावेळी काही जमून आलं नाही. आता तो विषय संपलाय. आता जर सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना जर वेगळ नाव मान्य असेल तर त्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही असं सांगत त्यांनी पवारांच्या नावाबद्दल  उत्सुकता दर्शवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2017 10:03 PM IST

ताज्या बातम्या