शिवसेनेची आर पारची भाषा, 26 तारखेला फैसला

  • Share this:

uddhav_matoshree

25 जानेवारी : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती होणार की नाही, यावरून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या तर्कवितर्कांचा 24 तासात फैसला होणार आहे. उद्या, प्रजासत्ताक दिनी गोरेगावमध्ये शिवसेनेचा भव्य मेळावा होणार आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे युतीबाबतचा फैसला जाहीर करतील, असं आज 'सामना'मधून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याचबरोबर, उद्याचा दिवस शिवसेनेसाठी 'स्पेशल 26' असल्याचं सामनात म्हटलंय.

गेल्या आठवड्यापासून या दोन पक्षांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या, मात्र त्यात चर्चेपेक्षा वादच अधिक होत आहेत. भाजपने 114 जागांचा प्रस्ताव दिलेला असताना, त्यांना फक्त 60 जागा सोडण्याची तयारी शिवसेनेने दाखवली आहे. त्यानंतर, दोन्ही पक्षांनी आपापल्या श्रेष्ठींवर अंतिम निर्णय सोपवला आहे. त्यामुळे  पक्षाच्या मेळाव्यात घोषणा करण्याचा सेनेचा पवित्रा पाहता, युतीची शक्यता मावळल्याचंच बोललं जातंय.

मुख्यमंत्री अजूनही युतीसाठी आग्रही असल्याचंही समजतंय. त्यांनी थेट उद्धव यांच्याशी चर्चा केल्यास वातावरण बदलू शकतं. पण केंद्रात आणि राज्यात एकत्र सत्तेत असलेले, पण सतत एकमेकांची उणीदुणी काढणारे शिवसेना आणि भाजप हे 'जुने मित्र' मुंबई महापालिकेत एकत्र लढणार की स्वबळावर, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरेच 26 तारखेला सर्व काही सांगतील, असं शिवसेना नेत्यांनी सूचित केलं आहे. त्यामुळे उद्या गोरेगावमध्ये होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहेत.

दरम्यान, दोन्ही पक्षातले नेते ज्याप्रमाणं भांडतायत त्यावरून अनेकांना बाळासाहेब, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांची आठवण येतेय. त्यांची उणीव स्पष्टपणे जाणवत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरतायत. उद्धव ठाकरेंनीही काल आय लव्ह यू कुणी म्हणायचं असा प्रश्न असल्याचं म्हटलंय. मुंडे महाजन होते त्यावेळेस ते लहान होऊन मातोश्रीवर जायचे आणि बाळासाहेबही मोठेपणा दाखवत जे देता येईल ते द्यायचे. तसा मोठेपणा आणि तसा लहानपणा घेणारे नेते दोन्हीत राहिले नसल्याची खंत व्यक्त केली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2017 11:08 AM IST

ताज्या बातम्या