विवेक कुलकर्णी, 24 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात छुप्या पद्धतीने आणि जाहीरपणे भाजपला मदत केली, अशी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय. समविचारी पक्ष एकत्र आले पाहिजे, असं म्हणत सन्मानपूर्वक आघाडी झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समविचारी आणि सन्मामपूर्वक हे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत, आपण जेव्हा समविचारी म्हणतो तेव्हा आपण इतिहास तपासला पाहिजे, असं ते म्हणाले.
कुणी काय विधानं केलीयत? कुणी आघाडी तोडली ? कुणी सरकार पाडलं ? कुणी विधानसभा निवडणुकीत भाजपला अप्रत्यक्ष मदत केली हे राज्याच्या जनतेला माहिती आहे, असा गंभीर आरोप पृथ्वी0राज चव्हाण यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला छुपी मदत करणं थांबवलं आहे की नाही हे स्पष्ट झालेलं नाही, ते स्पष्ट झालं असतं तर आनंदाने हातात हात घालून आघाडी केली असती, असंही त्यांनी सांगितलंय.
जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी आघाडी केलीच पाहिजे, असं काही नाही. आमच्या डोक्यात भाजपचा पराभव केला पाहिजे हे स्पष्ट आहे. तडजोडी करत असताना त्या सन्मानपूर्वक झाल्या पाहिजेत, ताकदीच्या जोरावर एकतर्फी आघाडी होणं योग्य नाही, असंही मत त्यांनी व्यक्त केलं. मुंबई काँग्रेसमधल्या वादाबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांना कानपिचक्या दिल्या. नेत्यांनी जाहीरपणे बोलताना एकमेकांबद्दल सकारात्मक बोलावं, नकारात्मक नाही हे राजकारणाचं मूलभूत तत्त्वज्ञान आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
भाजप पारदर्शकतेचा मुद्दा मांडतंय पण त्यांचा राज्यातला कारभार पारदर्शक म्हणता येईल का ? असा सवाल त्यांनी विचारला. महापालिकेत आणि राज्यात युतीत असलेला तणाव जनतेपर्यंत पोहोचतोय, सत्तेत राहायचं आणि त्याचे जे काही थोडेफार फायदे मिळतात ते घ्यायचे आणि दुसरीकडे विरोधक म्हणून वागायचं यामुळे शिवसेनेची विश्वासार्हता कमी झालीय. एकीकडे सत्तेचे फायदे घ्यायचे आणि मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले की गप्प बसायचं हा दांभिकपणा आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv