S M L

4 पॅनकार्ड वापरणाऱ्या कृपा शंकर सिंहांभोवती आयकर विभागाचा फास

Sachin Salve | Updated On: Jan 23, 2017 06:01 PM IST

4 पॅनकार्ड वापरणाऱ्या कृपा शंकर सिंहांभोवती आयकर विभागाचा फास

23 जानेवारी : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी काँग्रेसचे नेते कृपा शंकर सिंह यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झालीये. याआधी एसीबी आणि सीबीआय यांच्या चौकशीने कृपाशंकर सिंह यांना घाम फोडला होता तर आता ईडी आणि आयकर विभागाच्या चौकशीचा फास कृपाशंकर सिंह यांच्याभोवती आवळणार असं दिसतंय.

कृपाशंकर सिंह यांच्यावर दाखल असलेले गुन्हे, आरोप आणि तपास लक्षात घेतां हे प्रकरण मनी लाँड्रिंग एक्ट मध्ये मोडत असल्याचं दिसतंय. त्यामुळे या प्रकरणी ईडीचं काय म्हणणं आहे अशी विचारणा करत मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला नोटीस जारी केलीये. तर दुसरीकडे कृपाशंकर सिंह यांच्या ४ पॅनकार्डबाबत तक्रारारदाराने दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने आज न्यायालयात अहवाल सादर केला. त्यानुसार ४ पैकी २ पॅनकार्ड नंबर हे चुकीचे असून, एक पॅनकार्ड रद्द झाले असून एक पॅनकार्ड हे सुरु असल्याची माहिती आयकर विभागाने मुंबई उच्च न्यायालयाला दिली.

त्यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त करत, एका व्यक्तीचे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असणे हा गुन्हा नाही का? आयकर विभागाला यांची कल्पना नाही का? तुम्ही याबाबत काही तपास केलाय का? गुन्हा दाखल केलाय का? अशा कारवाईबाबत आयटी एक्ट मध्ये काही तरतूद आहे का? अशा प्रश्नांची फैरी झाडत आयकर विभागाला मुंबई उच्च न्यायालयाने झापले. आणि दोन आठवड्यात आपलं म्हणणं मांडावं असे आदेश आयकर विभागाला दिलेत. न्यायमुर्ती रंजीत मोरे आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिलेत.


तपास सीबीआयच्या ताब्यात ?

कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात दाखल बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी आतापर्यंत काय तपास केला तपास संपला आहे की अद्यापही सुरू आहे आणि असल्यास त्याची सध्या स्थिती काय आहे, अशी प्रश्नांची सरबत्ती करत त्याबाबतचा मोहोरबंद अहवाल तीन आठवडय़ात सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला गेल्या सुनावणीला दिले होते.

एसीबीकडून या प्रकरणाचा योग्य तपास करण्यात आलेला नाही, असा आरोप करत तपासाची सूत्रे सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी तुलसीदास नायर यांनी एका याचिकेद्वारे मागणी केली होती. त्यावेळी सुनावणीच्या वेळेस न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने या प्रकरणाच्या स्थितीबाबत विचारणा करत त्याबाबतचा मोहोरबंद अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त सरकारी वकील एफ. आर. शेख यांना दिले होते.

Loading...

परंतु तपास एसीबीतर्फे करण्यात येत आहे. तसंच उच्च न्यायालयाने वा राज्य सरकारने तपासाची सूत्रे वर्ग केली तरच सीबीआयकडून तपास केला जातो. याप्रकरणी अद्याप असे काहीच झालेले नाही, असे सीबीआयच्या वतीने अ‍‍ॅड्. हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितलं होतं. त्यामुळे एसीबीच्या अहवालानंतर तपास सीबीआयच्या ताब्यात जाणार की नाही हे निश्चित होईल. कृपाशंकर सिंह आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उच्च न्यायालयाने एसीबीला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते, परंतु चौकशीच्या नावाखाली एसीबीने काहीच केलेले नाही. त्यामुळे हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी याचिकाकर्ते नायर यांनी न्यायालयाकडे गेल्या सुनावणीला केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2017 06:01 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close