महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून घोषणांचा पाऊस

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून घोषणांचा पाऊस

  • Share this:

Shivsena bannere kas

22 जानेवारी :  मुंबई, ठाणे आणि उल्हासनगर महापालिकेच्या तोंडावर शिवसेनेने घोषणांचा पाऊस पाडला आहे. ठाणेकरांसाठी स्वतंत्र धरण, सेंट्रल पार्क आणि चौपाटीचा विकास अशा घोषणा उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.  दरम्यान युतीबाबत काहीही बोलण्याचं त्यांनी टाळलं. युतीची अजून चर्चा चालू असून भाजपकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आज (रविवारी) उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन घोषणांचा पाऊस पाडला आहे.

मुंबईप्रमाणेच ठाणेकरांनाही उद्धव ठाकरेंनी मालमत्ता करात सूट देण्याचं आश्वासन दिलं. 500 फुटापर्यंतच्या घरात राहणाऱ्या ठाणेकरांना मालमत्ता कर माफ केलं जाईल. तर 700 फुटापर्यंतच्या घरात राहणाऱ्यांना मालमत्ता करात सूट दिली जाईल असं ठाकरे यांनी जाहीर केलं.

ठाण्यातील पाणीटंचाईवर मुंबई हायकोर्टानेही चिंता व्यक्त केली होती. याचा दाखला देत उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई महापालिकेसाठी आम्ही स्वतंत्र धरण बांधले. यावेळी शिवसेनेची सत्ता आल्यास ठाण्यासाठीही स्वतंत्र धरण बांधलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांना पुन्हा सत्तेत आल्यानंतर ‘बेस्ट’ बसचा प्रवास मोफत करणार,  अशी घोषणाही त्यांनी केली. मात्र काही लोक आज सुद्धा म्हणतील की ही आमची जुनीच मागणी होती. पण मागणी मनातल्यामनात करणं आणि पुढे घेऊन येणं, यात फरक आहे, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष टोलाही लगावला.

त्याचबरोबर, ठाणेकरांना वीकएंडला विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण असावं यासाठी कोलशेतमध्ये सेंट्रल पार्क तयार केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. 30 एकरच्या जागेवर हा पार्क तयार केला जाणार असून या पार्कमध्ये थीम पार्क, लहान मुलांसाठी प्ले झोन, तलाव असेल असं त्यांनी सांगितलं.

खारेगावमध्ये सिंगापूरच्या धर्तीवर चौपाटीचा विकास केला जाईल. तसंच मीरा भाईंदर आणि ठाण्यात जलवाहतुकीला प्राधान्य देऊ असंही आश्वासन त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी घोषणांचा पाऊस पाडला असला तरी युतीविषयी मात्र त्यांनी ठोस प्रतिक्रिया दिलेला नाही. युतीबाबत अद्याप भाजपकडून प्रस्ताव आलेला नाही. भाजपकडून प्रस्ताव आल्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करु असे त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2017 03:15 PM IST

ताज्या बातम्या