गुंडांच्या प्रवेशावरून शिवसेनेची भाजपवर सडकून टीका

  • Share this:

uddhav-and-devendra

20 जानेवारी :  निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये होत असलेल्या गुंडांच्या प्रवेशावरून शिवसेनेने भाजपवर पुन्हा एकदा जोरदार निशाना साधला आहे. ' गुंडांना सत्ताधाऱ्यांची कवचकुंडले हवीच असतात व अशा गुंडांच्या मदतीने निवडणूक जिंकणे व पक्षाची व्याप्ती वाढवणे हे काळे धन जमा करण्यापेक्षा वाईट आहे. असे सर्व दाखलेबाज लोक कालपर्यंत राष्ट्रवादीच्या छत्रछायेखाली होते. ते सगळे एका रात्रीत ‘कमल निवासा’त विराजमान झालेत, अशी टीका शिवसेनेने दैनिक 'सामना' या मुखपत्रातून भाजपवर केली आहे. सत्तेचा तीळगूळ सगळय़ांनाच हवा असतो, पण भाजपने आपली कवळी सांभाळून असे राजकारण करावे' असा सल्ला उद्धव यांनी दिला आहे.

आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील महापालिका व पचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात अनेकांनी प्रवेश केला आहे. त्यामध्ये पुण्यातील कुख्यात गुंड विठ्ठल शेलारचाही समावेश असून याप्रकरणी बरीच टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी ' सामना'च्या अग्रलेखातून भाजपावर टीका केली आहे.

सत्ताधाऱ्यांच्या गंगेत डुबक्या मारून स्वत:स पावन करून घेत असतात. उत्तर प्रदेशात तेच सुरु आहे व महाराष्ट्रातही तेच तेच चालले आहे. गुंडांना सत्ताधाऱ्यांची कवचकुंडले हवीच असतात व अशा गुंडांच्या मदतीने निवडणूक जिंकणे व पक्षाची व्याप्ती वाढविणे हे काळे धन जमा करण्यापेक्षा वाईट आहे. असे सर्व दाखलेबाज लोक कालपर्यंत राष्ट्रवादीच्या छत्रछायेखाली होते. ते सगळे एका रात्रीत 'कमल निवासा'त विराजमान झाले. भाजप हा गुंडांचा पक्ष अशी टीका अजित पवारांनी केली. कारण हे सर्व लोक कालपर्यंत राष्ट्रवादीत होते व अजित पवार गुंडांचे आश्रयदाते असल्याची टीका कालचा विरोधी पक्ष करीत होता. अजित पवार आपल्या जागी आहेत. फक्त गुंडांनी आश्रयदाते बदलले आहेत. मनगटावरचे घड्याळ सोडून कमळ घेतले व देवपूजेला लागले. अनेक नामचीन लोक राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेशकर्ते झाले. त्यामुळे स्वच्छ प्रतिमा व चारित्र्याचे काय ? असे विचारले जाऊ शकते. कलंकित नेत्यांना भाजपने पक्षात प्रवेश देऊ नये, असे रामदास आठवले यांनाही सांगावे लागले. सत्तेचा तीळगूळ सगळ्यांनाच हवा असतो, पण भाजपने आपली कवळी सांभाळून असे राजकारण करावे. मित्र म्हणून म्हणून आम्ही त्यांना हे सांगत आहोत. शेवटी काय उंचे लोग उंची पसंद!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2017 09:24 AM IST

ताज्या बातम्या