तगड्या अभिनेत्याला सलाम

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 6, 2017 12:59 PM IST

तगड्या अभिनेत्याला सलाम

om puri saying bye

06 जानेवारी : तगडा अभिनय आणि भारदस्त आवाजानं काही दशकं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारे अभिनेते ओम पुरी यांच्या निधनानं सगळ्यांनाच दु:ख झालं. ओम पुरी यांना पद्मश्री पुरस्कारानंदेखील गौरवण्यात आलं होतं.एक नजर टाकूया अशा या हरहुन्नरी अभिनेत्याच्या कारकिर्दीवर.

हरियाणातल्या अंबालात जन्मलेल्या ओम पुरींनी शालेय जीवनापासून अभिनयात छाप पाडायला सुरुवात केली. त्यातूनच त्यांना एनएसडी म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर ओम पुरींनी मजमा ही त्यांची स्वत:ची संस्थाही सुरू केली होती.इंग्रजीवर फारसं प्रभुत्व नसलेल्या ओम पुरींनी भारदस्त आवाज आणि अभिनयानं नाट्यक्षेत्र गाजवलं. त्याचकाळात त्यांची आणि नसिरुद्दीन शहा यांची दोस्ती झाली. नंतर दोघंही पुण्यात एफटीआयआयला आले. तिथूनच ओम पुरींच्या फिल्म करिअरला सुरुवात झाली.

1976मध्ये घाशीराम कोतवाल या गाजलेल्या नाटकावर आधारित मराठी सिनेमानं त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. नंतर मात्र ओम पुरींनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक असे सरस सिनेमे दिले. अर्धसत्य, आक्रोश, मिर्च मसाला, जाने भी दो यारो, गांधी अशा सिनेमातून ते कायम स्मरणात राहतील. तर चाची 420, हेराफेरी, चायना गेटमधील रिटायर्ड फौजी, घायलमधील एसीपी डिसुझा, हेराफेरीमधला खडकसिंग, चुपचुपकेमधील प्रभातसिंह चौहान अशा कॉमेडी सिनेमातही त्यांनी उत्तम भूमिका केल्या. हिंदी, मराठी, तमिळ, फ्रेंच, इंग्लिश अशा विविध भाषांतल्या सिनेमात त्यांनी काम केलं. सिटी ऑफ जॉयसारख्या हॉलिवूडपटातल्या त्यांच्या भूमिकेचीही वाहवा झाली. ओम पुरींनी दीडशेहून अधिक सिनेमांत काम केलं.अगदी अलिकडच्या काळात त्यांचा प्रोजेक्ट मराठवाडा हा मराठी सिनेमाही आला होता. नाटकांवर त्यांचं विशेष प्रेम होतं.

ओम पुरी यांच वैयक्तिक आयुष्य हे खूप वादग्रस्त होतं.1993 साली ओम पुरी यांचं नंदिता पुरी यांच्याशी लग्न झालं.पण 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.ओम पुरी यांना ईशान नावाचा एक मुलगाही आहे.नुकत्याच सर्जिकल स्ट्राईकनंकतर त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली होती.

Loading...

अखेरच्या क्षणापर्यंत ओम पुरींनी सिनेसृष्टीशी आपली जोडलेली नाळ कायम ठेवली.अगदी अलिकडे म्हणजे 2016 साली ओम पुरींनी 7 सिनेमांत काम केलं.सलमान खानच्या 'ट्यूबलाइट' या आगामी सिनेमात त्यांची भूमिका आहे. गुरिंदर चड्ढाच्या Viceroys House मध्ये देखील त्यांनी काम केलंय.

बॉलिवूडचा टिपिकल हिरोस्टाईल चेहरा नसूनही ओम पुरी यांनी प्रत्येक भूमिकेत आपला ठसा उमटवला. चरित्र, खलनायकी, विनोदी कोणत्याही भूमिकेत जीव ओतणारा आणि ती भूमिका जिवंत करणारा अभिनेता आता शरीरानं आपल्यात नसेल पण त्याच्या अभिनयानं मात्र ते कायम स्मरणात राहतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 6, 2017 12:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...