#फ्लॅशबॅक2016 : महाराष्ट्रासाठी कसं राहिलं हे वर्ष ?

#फ्लॅशबॅक2016 : महाराष्ट्रासाठी कसं राहिलं हे वर्ष ?

  • Share this:

29 डिसेंबर : 2016 या सरत्या वर्षात राज्यातल्या जनतेनं आणि शेतकऱ्यांनी गेल्या शतकातल्या सर्वात मोठ्या दुष्काळाचा सामना सरत्या वर्षात केला. गेल्या चार वर्षांपासून राज्य दुष्काळाचा सामना करीत होते. मात्र त्याची दाहकता सरत्या वर्षात होती. या दुष्काळाच्या दृष्टचक्रात राज्यातली 23 हजार 811 गावं सापडली होती. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि सधन अशा पश्चिम महाराष्ट्रालाही दुष्काळाचे चटके बसले. दुष्काळाच्या सर्वाधिक झळा मराठवाड्याला बसल्या. मराठवाड्यात खरीप आणि रब्बीची पिकं वाया गेलीच शिवाय कधी नव्हे ते मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती.

मराठवाड्यातल्या जालना हिंगोली, औरंगाबाद, लातूर परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये पाण्याची प्रचंड टंचाई होती. पिण्याच्या पाण्याच्या एका हंड्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत होती. राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या जायकवाडी धरणातील मृतसाठाही संपत आला होता. अनेक धरणं कोरडीठाक पडली होती. मराठवाड्यातल्या जवळपास प्रत्येक गावाची तहान टँकरवर भागात होती. मराठवाड्याचा टँकरवाडा झाला होता. काही शहरी भागात महिन्यातून एकदा पाणी येत होतं. लातूरला तर मिरजहून रेल्वेनं पाणी आणण्याची वेळ  आली होती. दुष्काळामुळं गावगाडा ठप्प झाला होता. पाऊस नाही तर शेती नाही, शेती नाही तर उत्पन्न नाही. उत्पन्न नाही तर रोजगार नाही अशी अवस्था मराठवाड्याची झाली होती. दुष्काळात मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं होतं. हा दुष्काळ महाराष्ट्रातल्य़ा जनतेची आणि सरकारची सत्वपरीक्षा पाहणारा ठरला.

अखेर वरुणराजाची कृपा

गेल्या चार वर्षांपासून राज्यावर वरुणराजाची अवकृपा होती. मराठवाडा आणि खान्देशात दुष्काळ होता. त्यामुळे राज्यातली जनता यंदा पावसाची चातकासारखी वाट पाहत होती. सरत्या वर्षात मान्सून सरासरीपेक्षा जास्त होईल असा अंदाज हवामानखात्यानं वर्तवला होता. पण मे महिन्याचा वायदा दिलेल्या मान्सूननं जून उजाडला तरी गोवा ओलांडला नव्हता. त्यामुळे मान्सून महाराष्ट्राला यंदाही हुलकावणी देणार का अशी स्थिती निर्माण झाली होती. शेवटी बहुप्रतिक्षित मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. दरवेळी व्हाया कोकण येणारा मान्सून यावेळी व्हाया विदर्भमार्गे राज्यात दाखल झाला. सुरुवातीला संथपणे बरसणाऱ्या मान्सूनने सरत्या काळात आपले रंग दाखवायला सुरुवात केली. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तर दुष्काळग्रस्त मराठवाड्यात मान्सून धो धो बरसला. दुष्काळात तळ गाठलेली धरणं काठोकाठ भरली. जायकवाडी आणि कोयना धरणं काठोकाठ भरली. राज्यातली जवळपास सगळीच धरणं भरल्यानं महाराष्ट्राची पाण्याची चिंता वर्षभरासाठी कायमची मिटली. चार वर्ष दुष्काळाचा सामना केलेल्या मराठवाड्यानं अतिवृष्टी पाहिली. अतिवृष्टीमुळे 19 लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं पण या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी तक्रार केली नाही. यंदाच्या मान्सूननं परत महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केलं.

नारीशक्तीचा विजय

पुरोगामी महाराष्ट्रातल्या काही रुढीपरंपरा स्त्रीपुरुष समानतेला धक्का देणाऱ्या होत्या. त्यातली एक परंपरा म्हणजे शनिशिंगणापुरात महिलांना शनिचौथऱ्यावरील प्रवेशबंदी.....शनिमंदिराच्या परिसरात महिलांना प्रवेश होता. मात्र शनिचौथऱ्यावर महिलांना अभिषेक करण्यास परवानगी नव्हती. गेल्या दशकात अनेक सामाजिक संघटनांनी महिलांच्या शनिचौथरा प्रवेशासाठी आवाज उठवला. पण शनिचौथऱ्यावर कुणीही प्रवेश करण्याची हिंमत दाखवली नव्हती. एका अनामिक महिलेनं शनिचौथऱ्यावर प्रवेश करुन शनिला तेलाचा अभिषेक केल्यानंतर शनिचौथरा प्रवेशाच्या आंदोलनाला धार आली. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शनिचौथरा प्रवेशाचं आंदोलन उभं केलं. त्यांनी महिलांसह शनिचौथरा प्रवेशासाठी जाण्याचा प्रयत्न केला. पण कायदासुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करीत पहिल्यांदा देसाई यांना अडवण्यात आलं. तृप्ती देसाई आणि त्यांच्या महिला कार्यकर्त्यांनी शनिचौथरा प्रवेशासाठी लाठ्याकाठ्या खाल्या पण त्या मागं हटल्या नाहीत. जनमानसातला वाढता रेट्यामुळे शनिदेवस्थान समितीलाही माघार घ्यावी लागली. त्यानंतर तृप्ती देसाई दुसऱ्यांदा शनिशिंगणापूरला निघाल्या असतानाच नाशिकच्या दोन महिलांनी शनिचौथऱ्यावर जाऊन अभिषेक घातला. तृप्ती देसाई यांनीही नंतर शनिचौथरा प्रवेश केला. शनिचौथरा ओलांडून तृप्ती देसाई आणि त्यांच्या रणरागिणींनी पुरोगामी महाराष्ट्राची पताका खरोखरंच फडकत ठेवलीये.

'हाजी अली सबके लिये'

शनिशिंगणापूरच्या शनिचौथरा प्रवेशानंतर मुंबईतल्या हाजी अली दर्ग्याच्या मजारप्रवेशाच्या आंदोलनाला चालना मिळाली. मुंबईतल्या अनेक मुस्लिम संघटना आणि तृप्ती देसाईंची भूमाता ब्रिगेड यांनी मिळून हाजी अली सबके लिये नावाची एक आघाडी तयार केली. या आघाडीच्या माध्यमातून मजारप्रवेशाचं आंदोलन अधिक तीव्र करण्यात आलं. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी या संदर्भातली याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी एकवेळा हाजीअली दर्ग्यातील मजारप्रवेशाचा प्रयत्न केला. पण त्यांना पोलिसांनी अडवलं. शिवाय काही मुस्लिम संघटनांनीही तृप्ती देसाईंच्या मजारप्रवेशाला विरोध केला होता. मजारप्रवेशाची कोंडी कायम असतानाच ही कोंडी मुंबई हायकोर्टाने फोडली. मुंबई हायकोर्टानं मजारप्रवेश नाकारणं हा घटनेला आव्हान देणारी कृती असल्याचं सांगत महिलांना मजारप्रवेश मिळावा असा आदेश दिला. हाजी अली दर्गा ट्रस्टनं महिलांच्या मजारप्रवेशाच्या निर्णयाला हायकोर्टातच तात्पुरती स्थगिती मिळवत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टानं मात्र हायकोर्टाचाच निर्णय कायम ठेवत महिलांच्या मजारप्रवेशाला हिरवा कंदिल दिला. मुस्लिम संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हाजी अलीच्या मजारीत प्रवेश करीत नवा इतिहास रचला.

गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू

राज्यात 2 मार्च 2016 पासून गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू करण्यात आला. या कायद्यामुळं राज्यात गायी, बैल यांच्या हत्येला कायदेशीर बंदी घालण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या कायद्याच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली. या  कायद्यामुळे गोहत्या करणाऱ्यांना कायदेशीर शिक्षेची तरतूद लागू करण्यात आली. मुख्य म्हणजे गोवंश किती महत्त्वाचा आहे हे सरकानं कोर्टात पटवून दिलं त्यामुळं ही बाब धार्मिक न मानता कोर्टानं गोवंश हत्याबंदीचा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं. मात्र दुसरीकडं गोमांस बाळगणं हा गुन्हा ठरणार नाही हे सांगितलं. या निर्णयाला काही संघटना आणि राजकीय पक्षांनी विरोध केला. 1995साली तत्कालिन युती सरकारच्या काळात गोवंश हत्याबंदीचं विधेयक विधिमंडळात मंजूर करण्यात आलं होतं. पण तत्कालिन राष्ट्रपतींनी काही विधेयकात काही सुधारणा सुचवल्या होत्या. गेल्या पंधरा वर्षात त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सुधारणेसह हे विधेयक पुन्हा राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवलं. ते मंजूर झाल्यानं राज्यात गोवंश हत्याबंदी लागू करण्यात आली आहे.

 कोपर्डी सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरण

मागचं वर्ष अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीतल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणामुळं ढवळून निघालं. 13 जुलै 2016 रोजी कोपर्डी गावात नववीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीवर परिसरातल्याच तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केली. हत्येवेळी तिच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. या हत्येनंतर मोठा जनक्षोभ उसळला होता. पोलिसांनी या प्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना अटक केली. या आरोपींना तातडीने फाशी द्यावी या मागणीसाठी राज्यात मराठा समाजाचे लाखा लाखांचे मोर्चे निघाले. सरकारनं हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले. शिवाय खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी घटनेला नव्वद दिवस होण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी आरोपपत्र दाखल केलं. या प्रकरणाची रोजच्या रोज सुनावणी घेऊन खटल्याचा लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न राहणार आहे.

flashback_2323सावित्री कोपली...

सरत्या वर्षातली महाराष्ट्रातली एक सर्वात मोठी चटका लावणारी घटना म्हणजे महाडमध्ये सावित्री नदीवरचा पूल कोसळून झालेली दुर्घटना...3 ऑगस्टच्या रात्री सावित्री नदीला आलेल्या महाड-पोलादपूर दरम्यानचा एक ब्रिटीशकालीन वाहून गेला...या दुर्घटनेत पुलावरुन जाणाऱ्या २ एसटी बसेससह ७ ते ८ वाहनंही वाहून गेली. नौदलाच्या पाणबुड्यांना पुलापासून २०० मीटर्सवर बोरिवली-राजापूर बसचा सांगडा सापडला होता. दुसरी बसही ५०० मीटर्सवर आढळली. दुर्घटनेतल्या २६ जणांचे मृतदेह सापडले. इतरांचा शोध लागला नाही.

सैतान डॅाक्टरचा पर्दाफाश

सातारा जिल्ह्यातल्या वाईतल्या बोगस डॉक्टर संतोष पोळनं सहा खून केल्याची धक्कादायक माहिती ऑगस्ट महिन्यात समोर आली. जून महिन्यात मंगल जेधे या महिलेच्या बेपत्ता प्रकरणाच्या चौकशीतून संतोष पोळनं केलेल्या सहा खुनांना वाचा फुटली. मंगल जेधे हत्याप्रकरणात संतोष पोळ हा संशयित होता. त्याच्याविरोधात काही पुरावेही पोलिसांना मिळाले होते. पोलिसांनी या प्रकरणातली आणखी एक संशयित ज्योती मांढरे हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तिनं मंगलच्या हत्येची कबुली दिली. संतोष पोळला पोलिसांनी हिसका दाखवल्यानंतर संतोषनं गेल्या 13 वर्षांत केलेल्या सहा हत्यांची कबुलीच पोलिसांसमोर दिली. संतोष पोळनं सुरेखा चिकणे, वनिता गायकवाड, जगाबाई पोळ, नथमल भंडारी आणि सलमा शेख यांचाही खून केल्याची माहिती समोर आली.

डोंबिवली ब्लास्ट

डोंबिवलीतल्या एमआयडीसीमधील कंपन्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच डोंबिवलीतल्या प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटामुळं डोंबिवलीकरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला. तर 183 जण जखमी झाले. मृतांमध्ये कंपनीचे मालक वाकटकर यांची दोन मुलं सुमीत आणि नंदन वाकटकर आणि सून स्नेहल वाकटकर यांचा समावेश आहे. हा स्फोट एवढा जबरदस्त होता की जवळपास दहा किलोमीटर अंतरावर स्फोटाचा आवाज ऐकू गेला. तर दोन ते तीन किलोमीटर परिसरातल्या इमारतींची तावदानं फुटली. स्फोटाच्या आवाजानं कित्येक नागरिकांच्या कानांचे पडदे फाटले.  या स्फोटानंतर सरकारनं डोंबिवलीच्या मध्यवस्तीतून एमआयडीसी स्थलांतरीत करण्याची घोषणा केली. पण अजूनही याबाबत कारवाई सुरु झालेली नाही.

पुलगाव लष्कराच्या दारुगोळा भांडारात स्फोट

वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव इथल्या लष्कराच्या दारुगोळा भांडारात झालेल्या स्फोटात 17 जवानांचा मृत्यू झाला. तर 17 जण या स्फोटात जखमी झाले. मृतांमध्ये दोन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. 31 मे रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटानंतर या परिसरात भीषण आग लागली. ही आग परिसरात वेगानं पसरली. आगीमुळे या परिसरात स्फोट होत होते. खबरदारी म्हणून प्रशासनानं परिसरातली गावं रिकामी करुन घेतली होती. प्रयत्नांची शर्थ केल्यानंतर ही आग अटोक्यात आली. मृतांमध्ये लेफ्टनंट कर्नल आर एस पवार आणि मेजर मनोज यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 29, 2016, 11:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading