#फ्लॅशबॅक2016 : सरत्या वर्षात राजकारणात काय घडलं?

#फ्लॅशबॅक2016 : सरत्या वर्षात राजकारणात काय घडलं?

  • Share this:

flashback2016_new26 डिसेंबर : 2016 या सरत्या वर्षात लाखांच्या मराठा मोर्चांमुळे महाराष्ट्राचं फक्त राजकारण नाहीतर समाजमनही ढवळून निघालं...यासोबतच एकनाथ खडसेंचा राजीनामा, भुजबळ काका पुतण्यांची अटक या दोन घटना राज्याच्या राजकारणात मोठ्या खळबळजनक ठरल्या...आपण अशाच काही सरत्या वर्षातल्या राजकीय घटनांना धावता उजाळा देणार आहोत..

भुजबळ काका-पुतण्याला अटक

यावर्षातली सर्वातमोठी राजकीय घडामोड म्हणजे भुजबळ काका - पुतण्याची अटक...बेहिशेबी मालमत्ता प्रकरण आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्याअंतर्गंत ईडीने ही कारवाई केली. समीर भुजबळला 1 फेब्रुवारी तर छगन भुजबळा यांना 13 मार्चला अटक करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत हे दोन्ही काका-पुतणे तुरुंगातच आहेत. या दोघांनीही जामिनासाठी अनेकदा अर्ज केले पण अद्यापही या दोघांची सुटका होऊ शकलेली नाही. भुजबळ काका-पुतण्यांची अटक ही राष्ट्रवादीसाठी वर्षभरातला सर्वात मोठा धक्का मानला जातोय.

तटकरे-अजितदादांवर टांगती तलवार

राष्ट्रवादीत भुजबळांपाठोपाठ सिंचन घोटाळ्यातही अजित पवार आणि सुनील तटकरेंविरोधातला चौकशीचा ससेमिरा सरत्या वर्षात कायम आहे. या 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याविरोधात रान उठवत भाजप सत्तेवर आलेली आहे. या घोटाळा विरोधात भाजप खासदार किरीट सोमय्या यानी तटकरे आणि अजित पवार यांच्या विरोधात ई डी कडे तक्रार दाखल केलेली आहे. त्याची चौकशी अजूनही सुरूच आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या या दोन बडया नेत्यांवर अटकेची टांगती तलवार यापुढे कायम असणार आहे.

श्रीहरी अणेंचा राजीनामा

सरत्या वर्षात राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे हे वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून बराच काळ चर्चेत राहिले. वेगळ्या विदर्भापाठोपाठ वेगळ्या मराठवाड्याचीही मागणी त्यांनी केल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विशेषतः सत्ताधारी शिवसेनेनंच त्यांच्याविरोधात आघाडी उघडल्याने मुख्यमंत्र्यांना सरतेशेवटी 23 मार्चला त्यांचा राजीनामा घ्यावा लागला.पण राजीनामा देऊनही शांत राहतील ते अणे कसले.आताही त्यांनी वेगळ्या विदर्भासाठी स्वतंत्र आघाडी निर्माण करून आपला लढा सुरूच ठेवलाय.

एकनाथ खडसेंची गच्छंती

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंचा राजीनामा ही सरत्या वर्षातली सर्वात मोठी घटना होती. मुख्यमंत्रिपदावरून तसंही फडणवीस आणि त्यांच्यात छुपी लढाई सुरूच होती. अशातच भोसरीचं जमीन प्रकरण बाहेर आलं आणि 5 जून रोजी खडसेंना हायकमांडच्या आदेशानुसार राजीनामा देणं भाग पडलं. त्याचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यात आपणच बॉस असल्याचं दाखवून देत आपल्या इतर पक्षांतर्गंत विरोधकांनाही योग्य तो मेसेज दिला.

चंद्रकांत पाटील 2 नंबरचे मंत्री !

खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राज्य मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकावर कोण हा प्रश्न चर्चेला आलाच. पण अमित शहांच्या आशिवार्दाने चंद्रकांत पाटलांनी खडसेंकडचं महसूल खातं पटकावत तो प्रश्न देखील मिटवून टाकला. पुढे मंत्रिमंडळ विस्तारातही चंद्रकांत पाटलांचाच वरचष्मा कायम राहिला. 7 जुलैच्या मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांनाही सत्तेत सामावून घेण्यात आलं. सदाभाऊ खोत, महादेव जानकर यांच्यासह 10 मंत्र्यांनी नव्याने शपथ घेतली. शिवसेनेकडून गुलाबराव पाटील आणि अर्जुन खोतकर या दोन मंत्र्यानी शपथ घेतली तर भाजपकडून पांडुरंग फुंडकर, सुभाष देहमुख , जयकुमार रावल, संभाजी पाटील निलंगेकर याना कॅबिनेट तर रवींद्र चव्हाण, मदन येरावर याना राज्यमंत्री पद मिळालं. याच मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडे याच्याकडचं जलसंधारण खातं काढून घेत ते राम शिंदेंना कॅबिनेटमंत्रीपदी बढती दिली. यातून त्यांनी स्वतःला जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री म्हणवणाऱ्या पंकजा मुंडेंना आपणच बॉस असल्याचं पुन्हा एकदा दाखवूनही दिलं.

कोपर्डी प्रकरण आणि मराठा मोर्चे

सरत्या वर्षातली महाराष्ट्र हादरवणारी घटना म्हणजे नगर जिल्ह्यातल्या कोपर्डी बलात्कार घटना आणि त्यानंतर राज्यभर निघालेले मराठा क्रांती मूक मोर्चे....या लाखांच्या मूक मोर्चांनी सर्वांचीच झोप उडवली...राज्यभरात जवळपास प्रत्येक जिल्हयात हे मराठा क्रांती मोर्चे निघाले तेही अगदी शिस्तबद्ध पद्धतीने...कोपर्डी घटनेतील बलात्काऱ्यांना फाशी ही त्यांची तात्कालिक मागणी असली तरी मराठा आरक्षण हीच त्यांची प्रमुख मागणी होती.यानिमित्ताने अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणीही पुढे आली. या लाखांच्या मोर्चांच्या शिस्तीचीही अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली. या मोर्चांची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ईबीसी सवलीतीचीही घोषणा केली.पण मराठा आरक्षणाचं भिजत घोंगडं मात्र अजूनही कायम आहे.

बहुजन मोर्चे

मराठा समाजाच्या लाखांच्या मोर्चांनी अवघं समानमन ढवळून निघालं..पण त्याचवेळी ओबीसी आणि दलित समाजालाही अस्वस्थ केलं. म्हणूनच मग दलित आणि ओबीसींनी राज्यभरात संविधान मोर्चे काढून मोठं शक्तीप्रदर्शन केलं.अॅट्रॉसिटी कायदा कदापिही रद्द होऊ देणार नाही, ही दलित मोर्चांची प्रमुख मागणी राहिली. तर ओबीसी मोर्चांमधून आमच्या आरक्षणाला हात लावू नका, हा संदेश दिला गेला...एकूणच...या जातीय मोर्चांच्या निमित्ताने पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातलं जात वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झालं.

भगवानगडाचा वाद

सरत्या वर्षात सकल वंजारी समाजाचं श्रद्धास्थान असलेला भगवानगडही चांगलाच चर्चेच राहिला...महंत नामदेव शास्त्रींनी दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंना भाषणबंदी जाहीर केल्याने त्यांनी हा मुद्दा चांगलाच प्रतिष्ठेचा केला. दुसऱ्याच्या दिवशी पंकजा मुंडेंनी गडाच्या पायथ्याशी जोरदार शक्तीप्रदर्शन करत समाज आपल्याच पाठिशी असल्याचं दाखवून दिलं. तसंच या मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा मुंडेंनी राजू शेट्टी, महादेव जानकर, राम शिंदे यांना पुन्हा आपल्या व्यासपीठावर आणून जोरदार राजकीय शक्तीप्रदर्शनही केलं. त्यामुळे सरत्या वर्षात सेनेच्या शिवाजीपार्कच्या दसरा मेळाव्याऐवजी भगवानगडावरच्या दसरा मेळाव्याचीच अधिक चर्चा झाली.

भाजपचे मंत्री आरोपाचे धनी

भाजप सरकारच्या मंत्र्यांवरील आरोपांची मालिका यावर्षीही सुरूच होती. पंकजा मुंडे यांच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्यावतीने काढण्यात आलेला बारा हजार कोटींचा ठेका उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे वादात सापडला, हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे, आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांच्या खात्यातला स्वेटर घोटाळाही चर्चेत राहिला तर  नव्या दमाचे मंत्री महादेव जानकर हे त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे दोन-तीनदा अडचणीत सापडले. गडचिरोली निवडणूक अधिकाऱ्यांना धमकावल्या प्रकरणी तर जानकरांविरोधात रितसर गुन्हा देखील झालाय. यासोबतच गृह राज्यमंत्री रणजित पाटील, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची जमीन खरेदी, संभाजी पाटील यांच्या बँकेतला घोटाळाही काही काळ चर्चेचा विषय राहिले. दरम्यान, गेल्या वर्षीच्या चिक्की घोटाळ्यात मात्र, मुख्यमंत्र्यांनी या वर्षाअखेरीस पंकजा मुंडेंना क्लीन चीट देऊन टाकल्यानं त्यांना नक्कीच हायसं वाटलं असणार...

नगरपालिकेत भाजपचा झेंडा

या वर्षाच्या शेवटी पार पडलेली नगरपालिका निवडणूक भाजपसाठी चांगलीच फायदेशीर ठरली.नोटाबंदीचा त्रास सहन करूनही निमशहरी भागातल्या लोकांनी भाजपलाच भरभरून मतदान केलं. विशेषतः मुख्यमंत्र्यांची थेट नगराध्यक्षपद निवडीची खेळी भलतीच यशस्वी ठरली. पहिल्याच टप्प्यात भाजपचे तब्बल 50 नगराध्यक्ष विजयी झाले काँग्रेस, सेनेलाही थोडफार यश मिळालं तर गेल्यावेळी पहिल्या क्रमांकावर असलेली राष्ट्रवादी पहिल्या टप्यात थेट चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मात्र, काँग्रेससोबतच राष्ट्रवादीनेही बऱ्यापैकी कमबॅक मिळवलं. पण तरीही ओव्हरऑल परफॉर्मन्समध्ये भाजपच नंबर वन राहिलं. नगरपालिका निवडणुकीतल्या या शतप्रतिशत यशामुळे मुख्यमंत्र्यांची खूर्ची आणखीच बळकट झालीय.

नारायण राणेंचं कमबॅक

नारायण राणेंसाठी 2016 हे वर्ष गेल्यावर्षीच्या तुलनेत निश्चितच चांगलं राहिलं. जवळपास 2 वर्षांच्या विजनवासानंतर राणे विधान परिषदेत परतले....पहिल्याच अधिवेशनात राणेंनी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोपांच्या फैरी झाडून दणकेबाज पुनरागमन केलं. पण दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी सिक्रेट फाईल काढण्याची धमकी देताच राणेंनी आपली तलवार म्यान केली ती आजतागायत कायम आहे. दरम्यान, नगरपालिका निवडणुकीत कोकणात राणे गटाला बऱ्यापैकी यश मिळाल्याने ते अधूनमधून काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वावरही फैरी झाडत असतात. एकूणच चालू वर्ष राणेंसाठी राजकीय अर्थाने कमबॅक म्हणावा लागेल.

इंदू मिल स्मारक आणि शिवस्मारक !

गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही डॉ. बाबासाहेबांचं इंदू मिल स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं शिवस्मारक चांगलंच चर्चेत राहिलं. गेल्या वर्षी 11 ऑक्टोबरलाच इंदूमिल स्मारकाचं पंतप्रधानांच्या उद्घाटन झालं होतं. पण आज एक वर्ष उलटूनही स्मारकाचं काम सुरू होऊ शकलेलं नाही तर दुसरीकडे बहुचर्चित शिवस्मारकाचंही अखेर 24 तारखेला उद्घाटन पार पडलं ते देखील पंतप्रधानांच्याच हस्ते....नाही म्हणायला उद्धव ठाकरे सोबतीला होते..पण एकूणच हा शिवस्मारक भूमिपूजनाच्या भाजपने आगामी बीएमसी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मोठं शक्तीप्रदर्शन केलं. तिकडे पुण्यातही रखडलेल्या मेट्रो प्रकल्पाचं उद्घटान एकदाचं पार पडलं. तिकडेही पवार - मोदी या सदाबहार यशस्वी जोडीने उद्घाघाटनाला आवर्जून हजेरी लावली. भाजप-राष्ट्रवादीच्या या दुटप्पीपणामुळे काँग्रेसचा चांगलाच तिळपापड झाला. म्हणून मग काँग्रेसनं चक्क मोदींच्या आधीच मेट्रोचं उद्घाटन उरकून टाकलं.एकूणच कायतर सरतं वर्ष भाजपसाठी त्यातही विशेषतः मुख्यमंत्र्यांसाठी खुपच फलदायी ठरलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 26, 2016, 8:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading