बहुमताचा आदर करावाच लागेल, सामनातून मुख्यमंत्र्यांना इशारा

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Oct 27, 2016 02:36 PM IST

uddhav-and-devendra 121

27 ऑक्टोबर : नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंढे यांना अभय दिलं जाणार असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला बहुमताचा आदर करावाच लागेल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. मुंढे यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. लोकशाहीत बहुमताला किंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी उगाच ईरेला पेटू नये. लोकप्रतिनिधी एकमुखाने मुंढे यांच्या विरोधात उभे ठाकले असतील तर सरकारला बहुमताचा आदर करावाच लागेल, असं ‘सामना’तील अग्रलेखात ठणकावून सांगण्यात आलं आहे.

याशिवाय, अग्रलेखातून तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवरही निशाणा साधण्यात आला आहे. आयुक्त हा सरकारचा प्रतिनिधी असतो आणि त्याने घटना व कायद्याच्या चौकटीत राहून काम करायचं असतं. लोकप्रतिनिधींच्या कुंडल्या काढून त्यांना अडचणीत आणायचं आणि स्वत:चा धडाकेबाजपणा सिद्ध करायचा हे योग्य नाही. स्वत: मुख्यमंत्री विरोधकांशी विनम्रतेने वागतात आणि तेवढा संयम हा ठेवायलाच हवा. राज्य संयमाने व एकीने चालवायचे असते. मुंढे जिथे गेले तिथे त्यांच्यावर अशी वेळ आली. त्यामुळे त्यांनीच या गोष्टीचे आत्मपरीक्षण करायला हवं. एखाद्या ‘डॉन’ किंवा ‘रॉबिनहुड’प्रमाणे वागून लोकप्रियता मिळवल्यानेच अधिकारी चांगला ठरतो असं नाही. तुकाराम मुंढे यांच्यासमोर मोठी कारकीर्द आहे. त्यांना मोठे काम करायचे आहे, पण संयमाचा बांध तोडून डोक्यात राग घालून काम केले तर त्यांचे कठीण आहे. भारतीय जनता पक्षाच्या फक्त सहा नगरसेवकांना मतदानाचे स्वातंत्र्य दिले असते तर त्यांनीही मुंढेविरोधाचा षटकार ठोकलाच असता. फडणवीस आज त्यांचा अहंकार राजकीय स्वार्थासाठी कुरवाळतील, उद्याचे काय? असा सवालही उपस्थित केला आहे.

काय आहे हा वाद?

नवी मुंबईचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात महापालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेने मिळून सभागृहात आणलेला अविश्वासदर्शक ठराव काल मंजूर झाला. 105 विरुद्ध 6 मतांनी हा ठराव आज मंजूर करण्यात आलाय. या ठरावानंतर आज तुकाराम मुंढे यांनी मंत्रालय गाठले. तुकाराम मुंढेंनी मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव प्रविण परदेशींची भेट घेतली। परदेशी हे मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव आहे. मुंढे यांनी अविश्वास प्रस्तावाबाबत आपली बाजू मांडली. तसंच कामकाजाचा अहवालही सादर केला. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महापालिकेचा अविश्वास प्रस्तावाचा ठराव मुख्यमंत्री फेटाळणार आहे. राज्य सरकार प्रामाणिक अधिका•यांच्या पाठीशी आहे, असा संदेश मुख्यमंत्र्यांना यातून द्यायचा आहे. मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय अजून दिलेला नाही. मात्र, लवकरच याबद्दल निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2016 08:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...