10 ऑक्टोबर : अमेरिकन अध्यक्षपदाचे उमेदवार डॉनल्ड ट्रम्प यांची एक सनसनाटी व्हिडिओ क्लिप बाहेर पडली आणि अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक आणखीनच वादळी झालीय. 2005 सालच्या या व्हिडिओमध्ये डॉनल्ड ट्रम्प यांनी महिलांबद्दल अनुद्गार काढलेत. या व्हिडिओ क्लिपमध्ये ट्रम्प नेमकं काय बोलले हे तपशीलवार सांगणंही लाजिरवाणं आहे. आपले वेगवेगळ्या स्त्रियांशी कसे शरीरसंबंध होते, आपण स्त्रियांना कसं आकर्षित करायचो इतक्या थराला जाऊन ट्रम्प यांनी हे सगळं वर्णन केलंय.
वॉशिंग्टन पोस्टने ही व्हिडिओ क्लिप उघड केल्यानंतर अमेरिकेत डॉनल्ड ट्रम्प यांच्याबद्दल संतापाची भावना आहे. व्हिस्कॉन्सिनमधल्याएका प्रचाराच्या सभेतूनही ट्रम्प यांना माघार घ्यावी लागलीय. या वक्तव्याबद्दल माफी मागणारा एक व्हिडिओ ट्रम्प यांनी सोशल मीडियावर टाकला. पण तरीही अमेरिकन मतदार त्यांच्यावर कमालीचे नाराज झालेत.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या रूपात अमेरिकेत पहिल्यांदाच एक महिला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवतेय. ट्रम्प यांनी महिलांबद्दल असे उद्गार काढणं हे त्यामुळेही गांभिर्याने घेतलं जातंय. या वक्तव्यामुळे अमेरिकेतल्या सगळ्याच महिला मतदारांची नाराजी ट्रम्प यांनी ओढवून घेतलीय.
अमेरिकन निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आहे. याही टप्प्यात डॉनल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीतून माघार घ्यावी, अशा प्रतिक्रिया अमेरिकेत उमटतायत. पण कोणत्याही परिस्थितीत मी माघार घेणार नाही, असं ट्रम्प यांनी वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रालाच सांगितलंय.
याआधी डॉनल्ड ट्रम्प यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. मेक्सिको आणि अमेरिकेमध्ये भिंत बांधा हे त्यांचं गाजलेलं वादग्रस्त वक्तव्य. स्थलांतरितांना आसरा दिला तर 9/11 सारखे आणखी हल्ले होतील, असंही ट्रम्प म्हणाले होते. दहशतवादी हल्ल्यांमुळे असुरक्षित झालेले अमेरिकन मतदार त्यावेळी त्यांना पाठिंबा देत होते. पण आता ट्रम्प यांची महिलांबद्दलची वक्तव्यं पाहिली तर कुणीही त्यांच्या पाठिशी उभं राहणार नाही, अशीच स्थिती आहे. आपल्या बेताल, बेजबाबदार आणि अत्यंत खालच्या पातळीच्या वक्तव्यांमुळे रिपब्लिकन पक्षाचे हे अध्यक्षपदाचे उमेदवार पूर्णपणे एकटे पडलेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा