07 ऑक्टोबर : कोपर्डी बलात्कारप्रकरणी आज (शुक्रवारी)81 दिवसांनतर अखेर आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. साधारणत: 350 पानांचे हे आरोपपत्र असण्याची शक्यता आहे. आरोपी पकडल्यानंतर 90 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करणे आवश्यक आहे. नाहीतर आरोपीस जामीन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे काल उशिरापर्यंत अहमदनगर पोलिसांकडून यासंबंधीचे काम सुरू होतं.
17 जुलै रोजी अहमदनगरमधील कोपर्डी परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर कर्जत इथे बलात्कार करून तिची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनीही एक महिन्यात आरोपपत्र दाखल करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, या घटनेला 81 दिवस होत आले तरीही या प्रकरणी संशयितांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं नाही.
याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेत, येत्या दोन ते तीन दिवसांत संबंधितांवर आरोपपत्र दाखल न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला होता. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि गृहविभागवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
दरम्यान, पोलिसांकडून हा विलंब होत असल्यानेच लाखोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांत याप्रकरणाच्या निषेधार्थ मूक मोर्चांचं अयोजन करण्यात आलं. त्यामुळे आता पोलिसांच्या आरोपपत्रात नेमका काय उल्लेख आढळतो, किती जणांना आरोपी करण्यात येते याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv